नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ग्रामीण पोलिसांच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात येते. त्यानुसार ६ ते 31 ऑगस्टदरम्यान अमली पदार्थविरोधी कारवाई करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. यात रविवारी ग्रामीण पोलिसांनी हातभट्टीचे 31 अड्डे उद्ध्वस्त केले. या कारवाईत सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कारवाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी एकाच वेळी विविध ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. हातभट्टीवर अवैधरीत्या दारू बनविणाऱ्या संशयितांची धरपकड करीत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच वेळी 31 ठिकाणी छापे टाकून 37 संशयितांना पकडले. त्यांच्याकडून पोलिसांनी १ लाख ४७ हजार ९२५ रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे.
या धाडसत्रात जिल्ह्यातील जायखेडामधील ८, सटाणामधील ४, वाडीवऱ्हे, इगतपुरी. मालेगाव तालुकामधील प्रत्येकी ३, कळवण २, घोटी, पेठ, सायखेडा, देवळा, सुखाना, नांदगाव, चांदवड, मालेगाव किल्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील प्रत्येकी १ ठिकाणावर कारवाई करण्यात आली.
या कारवाई सत्रात पोलिस अधीक्षक शहाजी उमाप स्वतः सहभागी झाले होते. ग्रामीण भागातील डोंगर-दऱ्या नदीलगत असलेल्या गावांमधील गावठी हातभट्ट्यांवर छापे टाकून पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर मालमत्ता हस्तगत केली आहे.
नागरिकांनी अवैध व्यवसायविरोधात हेल्पलाइन क्रमांक ६२६२ २५६३६३ या क्रमांकावर तक्रार करावी. माहिती देणाऱ्याचे नाव व इतर माहिती गोपनीय ठेवण्यात येईल.
– शहाजी उमाप, पोलिस अधीक्षक
हेही वाचा :