हिंगोली : गोळीबार प्रकरणातील फरार आरोपींना अटक | पुढारी

हिंगोली : गोळीबार प्रकरणातील फरार आरोपींना अटक

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : येथील जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये भाजपाचे युवा जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर गोळीबार करून फरार झालेल्या दोन्ही संशयीत आरोपींना पोलिसांच्या पथकाने पुणे जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. या संशयीत आरोपींना अत्यंत गोपनीय पद्धतीने आज (मंगळवार) पहाटे साडेपाच वाजता हिंगोलीत आणले आहे. मुख्य आरोपींच्या अटकेमुळे आता या प्रकरणाचा गुंता सुटणार आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, येथील जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये भाजपाचे युवा जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर गोळीबार झाला होता. या प्रकरणात हिंगोली शहर पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले अक्षय इंदोरिया व ओम पवार हे दोघे या घटनेनंतर फरार झाले. पोलिसांनी या प्रकरणात एका अल्पवयीन आरोपीसह दोघांना पकडून चौकशी केली. मात्र मुख्य आरोपीच्या अटकेनंतरच या प्रकरणाचा गुंता सुटणार होता. दरम्यान या प्रकरणामध्ये काही राजकीय मंडळींची नावे ही घेतली जात असल्याने गोळीबार प्रकरणाचा तपास भरकटणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यातच आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. तसेच विधान परिषदेमध्येही आमदार तानाजी मुटकुळे यांनी सीआयडी चौकशीची मागणी केली.

दरम्यान, या प्रकरणात फरार असलेल्या आरोपींच्या शोधासाठी पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील उपाधिक्षक प्रशांत देशपांडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक पंडित कचवे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांचे पथक मागील तीन दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात आरोपींचा शोध घेत होते. या पथकाने साध्या वेषात पुणे, चाकण, बारामती परिसरात फिरून माहिती घेतली होती. त्यानंतर एका ठिकाणी त्यांचा ठाव ठिकाणा लागल्यानंतर पोलिसांच्या पथकाने रात्री छापा टाकून त्यांना पकडले. या दोघांनाही हिंगोली येथे अत्यंत गोपनीय पद्धतीने मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता हिंगोलीत आणण्यात आले आहे. दरम्यान, दोन्ही मुख्य आरोपीच्या अटकेनंतर पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. त्यांच्या चौकशीमध्ये सर्व घटनाक्रम व महत्त्वाच्या बाबी उघड होणार असल्याचा दावा पोलीस विभागाने व्यक्त केला आहे.

हेही वाचा : 

Back to top button