टोमॅटोने 'भाव' खाल्‍याने शाकाहारी थाळी दरात तब्‍बल ३४ टक्‍क्‍यांनी वाढ! | पुढारी

टोमॅटोने 'भाव' खाल्‍याने शाकाहारी थाळी दरात तब्‍बल ३४ टक्‍क्‍यांनी वाढ!

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मागील दोन-तीन महिन्‍यात टोमॅटो दरात सातत्‍याने वाढ होत आहे. याचा फटका सर्वसामान्‍य ग्राहकांना बसू लागला आहे. टोमॅटो बरोबरच काही भाज्‍यांच्‍या किंमतीही वाढल्‍याने दररोज घरोघरी करण्‍यात येणार्‍या शाकाहारी थाळी ( Veg Thali ) तयार करण्‍याच्‍या किंमतीत तब्‍बल ३४ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती अर्थ विषयक विश्‍लेषक करणार्‍या क्रिसिल या संस्‍थेने आपल्‍या अहवालात दिली आहे.

Veg Thali : शाकाहारी थाळीच्‍या दरवाढीत टोमॅटोचा वाटा २५ टक्‍के

क्रिसिलच्या अहवालानुसार, शाकाहारी थाळीच्या किमतीत झालेल्या ३४ टक्के वाढीपैकी २५ टक्के वाटा टोमॅटोचा आहे. जूनमध्ये टोमॅटोने सुमारे ३३ रुपये किलो होता, आता काही ठिकाणी हा दर 200 रुपये किलोपेक्षाही अधिक आहे. कांदा आणि बटाट्याच्या दरातही दर महिन्याला १६ आणि ९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मिरची व अन्‍य जिन्‍नसाच्‍या दरातही झपाट्याने वाढ झाली आहे.

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून टोमॅटो आणि इतर भाज्यांच्या गगनाला भिडलेल्या किमतींनी बजेट बिघडले आहे. मिरची आणि जिरे देखील महाग झाले आहेत, त्यांच्या किमती जुलैमध्ये अनुक्रमे ६९ टक्‍के आणि १६ टक्‍के वाढल्या आहेत, असे या अहवालात म्‍हटले आहे. सर्वसामान्‍यांना रोजच्‍या जगण्‍यातील शाकाहारी थाळी तयार करण्‍याच्‍या दरात सरासरी २८ टक्‍यांनी वाढ झाल्‍याचे चित्र आहे.

मांसाहारी थाळीत १३ टक्‍के वाढ

टोमॅटो दरवाढीमुळे मांसाहारी थाळीतही १३ टक्‍के वाढ झाल्‍याचे या अहवालात नमूद करण्‍यात आले आहे. मांसाहारी थाळीची किंमत संथ गतीने वाढली आहे. ब्रॉयलरच्या किमतीत वाढ झल्‍याने हा दर वाढला आहे.

असा काढला जातो घरगुती थाळी तयार करण्‍याचा सरासरी खर्च

अहवालानुसार, घरगती थाळी तयार करण्याचा सरासरी खर्च उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम भारतात असणार्‍या वस्‍तुंच्‍या किंमतींच्या आधारे काढला जातो. तृणधान्ये, कडधान्ये, ब्रॉयलर, भाजीपाला, मसाले, खाद्यतेल, स्वयंपाकाचा गॅस किंमतीत होणारे बदलचाही या आकडेवारीत विचार केला जातो. एका शाकाहारी थाळीचा खर्च काढताना चपाती, भाज्या (कांदा, टोमॅटो आणि बटाटा), तांदूळ, डाळ, दही आणि सॅलड यांचा समावेश होतो. मांसाहारी थाळीच्‍या खर्चाचा विचार कराताना डाळऐवजी चिकनचा समावेश केला जातो.

हेही वाचा :

 

 

Back to top button