नाशिक : बोधीवृक्ष स्थापना महोत्सवाचे सूत्रबद्ध नियोजन करा ; छगन भुजबळ यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

सिडको, नाशिक : पुढारी वृत्तसेवा
त्रिरश्मी बुद्धलेणी येथील बुद्धस्मारकाच्या परिसरात येत्या ऑक्टोबर महिन्यात श्रीलंकेतील अनुराधापूर येथील बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण केले जाणार आहे. या बोधीवृक्ष स्थापना महोत्सवासाठी देशभरातून उपासक येणार असल्याने त्यादृष्टीने सोयी-सुविधांचे सूत्रबद्ध नियोजन करण्याच्या सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी उपिस्थत अधिकाऱ्यांना दिल्या.
रविवारी (दि.30) मंत्री छगन भुजबळ यांनी त्रिरश्मी बुद्धलेणी बोधीवृक्ष स्थापनेचे नियोजित स्थळ व सभा ठिकाण यांची पाहणी केली. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलिस आयुक्त अकुंश शिंदे, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, पोलिस उपआयुक्त मोनिका राऊत, शहर अभियंता एस. आर. वंजारी, राष्ट्रवादी कँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, आनंद सोनवणे, शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टचे मुख्य संयोजक भदत्न सुगत, भगवान दोंदे, राकेश दोंदे, बॉबी काळे, बाळासाहेब शिंदे, दिलीप साळवे, विकी चाबूकस्वार, उमेश गायकवाड, रमेश जाधव यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले, येत्या ऑक्टोबर महिन्यात देशव्यापी बोधीवृक्ष स्थापना महोत्सव शहरात या ठिकाणी महिनाभर होणार आहे. या महोत्सवास श्रीलंका, थायलंड, कोरिया, ब्रह्मदेश, मलेशिया, जपान, तैवान, व्हिएतनाम व कंबोडिया या देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आणि भन्ते व उपासक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्यादृष्टीने बुद्धस्मारक परिसरात वाहनव्यवस्था, येणाऱ्या बौद्ध उपासकांची निवास, भोजनव्यवस्था, सुरक्षाव्यवस्था व इतर सोयी-सुविधांचे नियोजन करावे. तसेच सभेचे नियोजित स्थळी खड्डेभरणी, सपाटीकरण व इतर तांत्रिक आनुषंगिक बाबींची पूर्तता करण्याबाबच्या सूचना ना. भुजबळ यांनी उपस्थित अधिकारी व अभियंता यांना दिल्या.
बोधीवृक्षाचे ऐतिहासिक महत्त्व
बोधीवृक्षाचे ऐतिहासिक महत्त्व असून, इ. स. पूर्व 2566 वर्षांपूवी सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना निरंजना नदीच्या काठावार बोधीवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले. त्यामुळे हे बोधीवृक्ष अतिपूजनीय आहे. पुढे सम्राट अशोक यांच्या मुलांनी या बोधीवृक्षाची फांदी श्रीलंकेच्या देवानामप्रिय तिरस यांच्या हस्ते अनुराधापूर येथे स्थापित केली. याच बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण नाशिक शहरात करण्यात येणार असल्याने शहराच्या ऐतिहासिक महत्त्वात भर पडणार असल्याची माहिती शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टचे मुख्य संयोजक भदत्न सुगत यांनी यावेळी दिली.
हेही वाचा :