सातारा : भिवडीत रात्रीत 7 घरे फोडली; घरफोड्यांचे सत्र सुरूच | पुढारी

सातारा : भिवडीत रात्रीत 7 घरे फोडली; घरफोड्यांचे सत्र सुरूच

कुडाळ; पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यात घरफोड्यांचे सत्र दुसर्‍या दिवशीही सुरूच राहिले. वाई तालुक्यानंतर चोरट्यांनी आता जावलीकडे मोर्चा वळवला आहे. भिवडी (ता. जावली) येथे एका रात्रीत सात घरफोड्या झाल्या असून सुमारे 70 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. घरातील फर्निचरचीही तोडफोड करण्यात आली आहे.

किसन चव्हाण यांच्या घरातून दोन तोळ्याचे सोन्याचे गंठण, सागर साहेबराव भिसे यांच्या घराची कडी काढून चोरट्यांनी सोन्याची 3 ग्रॅमची अंगठी व रोख 1800 रुपये लंपास केले. चोरट्यांनी संपत तरडे यांच्या घरातील फर्निचरची तोडफोड केली आहे. बबन अण्णा चव्हाण, कृष्णराव परशुराम चव्हाण, रविकांत एकनाथ दरेकर, भरत गोपाळ चव्हाण, संपत यशवंत तरडे यांच्या घरातील वस्तूंचीही तोडफोड चोरट्यांनी केली आहे. रात्री बारा ते तीनच्या दरम्यान चोरट्यांनी घरे फोडली आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

गावात चोरटे घुसल्याचे लक्षात आल्यानंतर सरपंच श्रीकांत निकम यांनी ग्रामपंचायतीवरील भोंगा वाजवला. भोेंग्याच्या आवाजानंतर सर्व गावकरी उठून एकत्र गोळा झाल्याचे दिसताच चोरट्यांनी पलायन केले. मात्र, या प्रकारामुळे गावात भितीचे वातावरण आहे. याबाबतची फिर्याद किसन दत्तात्रय चव्हाण यांनी कुडाळ पोलिस ठाण्यात दिली आहे. भिवडी येथे सीसीटीव्ही यंत्रणा नसल्याने चोरटे पकडणे कुडाळ पोलिसांसमोरचे आव्हान आहे.

Back to top button