फुलांनी खुलवा सौंदर्य, जाणून घ्या कसे? | पुढारी

फुलांनी खुलवा सौंदर्य, जाणून घ्या कसे?

पुराणकाळामध्ये राजकन्या जलविहार करत असताना त्यांच्या स्नानगृहामधील बाथटबमध्ये गुलाबाच्या पाकळ्या, मोगर्‍याची फुले पसरलेली वर्णने असायची. तेव्हापासून फुलांमधून सौंदर्य खुलवण्याची किमया ज्ञात होती.

निसर्गात असे काही घटक आहेत की, त्याआधारे आपण आपला चेहरा, त्वचा सुंदर आणि तजेलदार बनवू शकतो. यामध्ये फुलांचा वाटा मोठा आहे. फुलांच्या आधारे आपले सौंदर्य खुलवू शकतो. निसर्गात अशी अनेक फुले आहेत की, त्यांचा उपयोग करून आपण आपले सौंदर्य अबाधित ठेवू शकतो. निसर्गातील प्रत्येक गोष्ट घेण्यासारखी आहे. आपल्या शरीर आणि मानसिक सौंदर्यात निसर्गाचे योगदान मोठे आहे. निसर्गात फुलणारी फुलेही आपले सौंदर्य वाढवत असतात. घराच्या आसपास उमललेली ही फुले आपल्यासाठी आरोग्य आणि ब्युटी टिप्स घेऊन येतात.

रोज रात्री गुलाबजल चेहर्‍याला लावून झोपावे. गुलाबजलाने दुसर्‍या दिवशी चेहरा तजेलदार दिसू लागेल. अंघोळीच्या पाण्यात थोड्या गुलाबाच्या पाकळ्या टाकून अंघोळ करावी. गुलाबाचा अर्क पाण्यात उतरेल, याची काळजी घ्यावी. यामुळे त्वचाही सुंदर आणि कोमल बनेल.

गुलाबाच्या फुलांनंतर चमेलीचे फूलही महत्त्वाचे ठरते. हे फूल केसांचे आरोग्य उत्तम ठेवते. चमेलीचे फूल त्वचा व केसांना अत्यंत उपयोगी आहे. रात्री पाण्यात चमेलीची फुले भिजत ठेवा. सकाळी मिक्सरमध्ये त्यांना बारीक करून घ्या. त्यानंतर त्यात दोन चमचे गुलाब पाणी टाका. चमेली व गुलाब पाण्याचे मिश्रण लावल्याने केसांना चमक येते. हा लेप चेहर्‍यावर लावल्याने त्चचा सतेज होते.

गुलाब आणि चमेलीच्या फुलांनंतर जास्वंदीचे फूलही सौंदर्यवृद्धीमध्ये तितकेच महत्त्वाचे ठरते. जास्वंदीचे फूलही अत्यंत गुणकारी असते. एक लिटर तिळाच्या तेलात दहा जास्वंदीची फुले टाकून उन्हात ठेवावे. दररोज आधीची फुले काढून त्या जागी ताजी फुले तेलात टाकावीत. जोपर्यंत तेलाला लाल रंग चढत नाही तोपर्यंत फुले बदलत राहा. जास्वंदीचे तेल केसांना लावल्याने केसातील कोंडा नाहीसा होऊन केस गळत नाहीत.

हेही वाचा : 

 

Back to top button