जागतिक व्याघ्र दिन विशेष : आशिया खंडातील सर्वात ताकदवान वाघ 'वाघडोह' | पुढारी

जागतिक व्याघ्र दिन विशेष : आशिया खंडातील सर्वात ताकदवान वाघ 'वाघडोह'

मनोज कावळे

ओझर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

जंगलाचा राजा म्हणून भारतात सिंहाची ओळख असली, तरी तो मात्र, तोडोबाचा अनभिषिक्त सम्राट होता. तब्बल आठ फूट लांबी, वजन सुमारे 200 किलो. ताडोबातील त्याचा रुबाब पर्यटकांना भुरळ पाडत असे. ताडोबाची सफारी त्याला न बघता कोणाचीही पूर्ण होणार नाही, असा तो आशिया खंडातील सर्वात ताकदवान, राजबिंडा वाघ. त्याचे नाव वाघडोह. ताडोबाला याच वाघडोहने किमान ३५ ते ४० वाघ दिले. जागतिक व्याघ्र दिनानिमित्त नाशिकचे प्राणिमित्र तथा हौशी पर्यटक अनंत सरोदे यांनी वाघडोहच्या सांगितलेल्या आठवणी…

साधारण २०११ सालापासून व्याघ्र दर्शन आणि ताडोबा हे आमच्या आयुष्यातील समीकरण झाले होते. ताडोबातील सफारी सुरू केल्यानंतर पहिला वाघ वसंत बंधारा येथे दिसला. त्यानंतर गाइड आणि पर्यवेक्षक यांच्या चर्चेतून एक वाघ ज्याच्याबद्दल सर्वच पर्यटक भरभरून बोलायचे, तो म्हणजे वाघडोह. त्याचे प्रथम दर्शन हे अंधारी नदी परिसरात झाले. तो परिसर म्हणजे एक डोह होता. या परिसरात वाघाचे वास्तव्य होते म्हणून वाघडोह त्याचे नामकरण झाले. दाक्षिणात्य लोकांनी याच वाघडोहला बाघडोह असे संबोधणे सुरू केले आणि पुढे बाघडोह हेच त्याचे नाव प्रचलित झाले. आम्हाला बाघडोहचे दर्शन मिळण्यासाठी तब्बल तीन वर्षे प्रतीक्षा करावी लागली. त्याचे वास्तव्य तसे तेलिया धरण परिसरात स्थिरावलेले होते. परंतु माधुरी नावाच्या वाघिणीने तिच्यापासूनच झालेल्या सोनम या वाघिणीने या परिसरातून हाकलण्यामुळे ती वाघीण जुनोना परिसरात गेली आणि बाघडोहही जुनोना येथे गेला.

तेलिया अंधारी या परिसरात आम्हाला कधी दर्शन झाले नाही, परंतु डिसेंबर २०१४ जुनेना तलाव येथे बाघडोह येत असल्याची माहिती मिळाली आणि अखेर बाघडोहची प्रतीक्षा संपली. सकाळची सफर बाघडोहच्या प्रतीक्षेत असफल झाल्याने आम्ही पर्यटक थोडेसे उदास झालो होते. परंतु दुपारी पुन्हा आमची दुसरी सफर सुरू झाली. आमच्या गाइडने आम्हाला सांगितले, आपण जुनोना तलाव येथे जाऊ आणि अखेर आमचे बाघडोह बघण्याचे स्वप्न पूर्ण झाले. बाघडोह हा जुनोना तलावात आरामात पहुडलेला होता. आम्ही तेथे पोहोचणारे प्रथम पर्यटक होतो. बाघडोहला याचि देही याचि डोळा बघताना अंगावर रोमांच उभे राहिले होते. एवढा मोठा वाघ आयुष्यात पहिल्यांदाच बघत असल्याने ताडोबाची सहल खरोखरच सार्थकी लागल्याचे समाधान होते. बाघडोह दोन तास पाण्यात निश्चिंत बसून आराम करत होता. 5 च्या सुमारास तो उठला त्याच्या एकंदरीत शारीरिक हालचालींवरून त्याने मोठ्या शिकारीवर यथेच्छ ताव मारलेला दिसत होता. तो पाण्यातून उठून रुबाबात चालत घनदाट जंगलात निघून गेला. त्यानंतर बाघडोहला बघण्यासाठी तीन वर्षे ताडोबात सफारी केली. परंतु प्रत्येक सफारीत तो आम्हाला हुलकावणीच देत राहिला आणि एका सफारीत अचानक तो देवडा जुनोना संरक्षण कुटियाजवळ कक्ष क्रमांक १७५ येथे कृत्रिम पाणवठ्यावर दिसला. यावेळी अज्ञात जनावराच्या हल्ल्यात त्याच्या उजव्या पायाला जखम झाल्याने तो थोडासा लंगडत होता. त्यानंतर २०१७ साली त्याचे पुन्हा दर्शन झाले. यावेळी मात्र, बाघडोह म्हातारपणाकडे झुकलेला दिसला, परंतु माधुरी या वाघिणीपासून झालेल्या बछड्यांसह तो माधुरीसह एक कुटुंबप्रमुख म्हणून दिसला. त्याच्या व्यक्तिमत्त्वातील जरब कायम होती, परंतु शारीरिक हालचालींवरून तो थकलेला दिसत होता. २०१९ मध्ये एका अस्वलाची शिकार केल्यानंतर तो दिसला. तेव्हादेखील त्याचे म्हातारपण दिसत होते. त्या नंतरच्या दिवसांत बाघडोह एकटाच दिसू लागला. त्याच्या शेवटच्या दिवसांत कोळसाखाण पद्मापूर परिसरात त्याचे वास्तव्य होते. वाघ जसा आपल्या वार्धक्यात प्रवेश करतो, तसा त्याला जीवनाच्या सर्वाच्च संघर्षाला सामोरे जावे लागते.

अखेर याच परिसरात त्याचा अंत झाला.
आशिया खंडातील सर्वात मोठा वाघ असा लौकिक असणाऱ्या वाघडोहाचे आयुष्य १९ वर्षांचे होते. तो राजासारखा जगला. टायगर सिस्टर ऑफ तेलिया या प्रसिद्ध डिस्कव्हर डाॅक्युमेंट्रीमध्ये लारा सोनम, गीता मोना ज्या चार वाघिणी आहेत. त्या वाघडोह आणि माधुरीपासून झालेल्या आहेत. या पिलासोबत हा वाघ नेहमी आई नसताना सांभाळ करायचा. वाघ वर्गीयमध्ये हे दृश्य दुर्मीळ आहे.

हेही वाचा :

Back to top button