नाशिकमध्ये पावसाचा जोर वाढला | पुढारी

नाशिकमध्ये पावसाचा जोर वाढला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गेल्या काही दिवस थांबलेल्या पावसाचा जोर सोमवारी (दि. २४) वाढला. पहाटेपासून ते दुपारी १२ पर्यंत मध्यम ते जोरदार सरी बरसल्या. त्यानंतर विश्रांती घेतलेल्या पावसाने सायंकाळनंतर पुन्हा एकदा हजेरी लावली. त्यामुळे कार्यालयांमधून घराकडे परतणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय झाली.

चालू महिन्याच्या प्रारंभी दडी मारून बसलेल्या पावसाने दोन दिवसांपासून हजेरी लावली आहे. शहर व परिसरात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहतूक मंदावली. परिणामी, शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याने सर्वसामान्य नाशिककरांना कार्यालय गाठताना विलंब झाला. दुपारच्या सत्रात काही काळ पावसाने उघडीप दिली. यावेळी सूर्यनारायणाने दर्शन दिले, तर सायंकाळनंतर पुन्हा एकदा पावसाने चांगलाच जोर पकडला हाेता. दरम्यान, पावसाच्या हजेरीमुळे नाशिककर सुखावले आहेत. सकाळी ८ ते सायंकाळी साडेपाच वेळेत २.१ मिमी पर्जन्याची नोंद करण्यात आली.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मात्र पावसाचा लपंडाव सुरूच आहे. जिल्ह्याचा पश्चिम पट्ट्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ व सुरगाणा हे चार तालुूके वगळता अन्यत्र पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. परिणामी, पेरण्यांना विलंब होत असल्याने शेतकरीराजा चिंताग्रस्त झाला आहे. तर धरणांमध्येही अपेक्षित पाणीसाठा नसल्याने जिल्हावासीय हवालदिल झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात २८ जुलैपर्यंत हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button