पुणे : रानडे ट्रस्टच्या 16 एकरांवर जावई-मेहुण्याने लावली स्वतःची नावे!

पुणे : रानडे ट्रस्टच्या 16 एकरांवर जावई-मेहुण्याने लावली स्वतःची नावे!

पुणे; पुढारी वृत्तसेवा : न्यायमूर्ती गोविंद महादेव रानडे यांच्या स्मृतीत रमाबाई रानडे यांनी स्थापन केलेल्या रानडे ट्रस्टलाही फसवून जमीन बळकावल्याचा आरोप असलेल्या देशमुख-काळे या जावई-मेहुणे जोडीने जमीन स्वत:च्या नावे केल्याचे समोर आल्यानंतर आता हे प्रकरण उच्च न्यायालयात सुनावणीसाठी आले आहे.  बनावट कागदपत्रांच्या आधारे 16 एकर जमीन स्वतःच्या नावे केल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

मात्र, पोलिसांनी गंभीर दखल न घेतल्याने ट्रस्टचे सदस्य असलेल्या सुनील भिडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटी संस्थेचे पदाधिकारीच गैव्यवहार करीत असल्याचे लक्षात आणून दिले. रानडे ट्रस्ट ही " सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटी " या संस्थेची दानदात्री आणि मार्गदर्शक संस्था आहे. 2018 मध्ये ट्रस्टचे नवनियुक्त सदस्य म्हणून सुनील भिडे यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर भिडे यांनी रानडे ट्रस्टचा अभ्यास केला.

ट्रस्टच्या कागदपत्रांची तपासणी करताना जावई – मेहुण्याचा प्रताप त्यांच्या लक्षात आला. मावळ तालुक्यातील बांबर्डे परिसरात असलेल्या 16 एकर जमिनीवर ट्रस्टशी तीळमात्र संबंध नसलेल्यांची नावे असल्याचे दिसून आले. सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटीचे विद्यमान सचिव असलेल्या मिलिंद देशमुख यांनी त्यांचा मेहुणा असलेल्या सागर काळे आणि त्यांचा मित्र असलेले शिवाजी धनकवडे या तिघांची नावे ट्रस्टच्या नावावर असलेल्या सातबार्‍यावर दिसून आली.

फौजदारी गुन्हा

ही बाब रानडे ट्रस्टच्या इतर सदस्यांसह सुनील भिडे यांच्या लक्षात आणून दिली. त्या वेळी ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांनी एकमुखी निर्णय घेत मिलिंद देशमुख, सागर काळे, शिवाजी धनकवडे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत निर्णय घेतला. 15 डिसेंबर 2021 रोजी सदस्य असलेले सुनील भिडे यांनी डेक्कन पोलिस निरीक्षक यांच्या नावाने रीतसर तक्रार अर्ज दाखल केला. सोबतच तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनाही पत्राद्वारे माहिती देत पुणे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर केले. तत्कालीन डेक्कन पोलिस निरीक्षकांनी तक्रारीनंतरही काहीच कारवाई न केल्याने भिडे यांनी 7 मे 2022 रोजी पोलिस उपायुक्त यांच्याकडे पुन्हा रीतसर तक्रार अर्ज पुन्हा दाखल केला.

…अखेर उच्च न्यायालयात धाव

बनावट कागदपत्र बनवून रानडे ट्रस्टची जागा आपल्या नावे करून घेण्याचा कारनामा पुराव्यानिशी लक्षात आणून दिल्यानंतरही पोलिसांनी संबंधितांवर काहीच कारवाई केली नाही. यानंतर भिडे यांनी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना दोन पत्र पाठवून न्याय मागितला. उच्च न्यायालयानेदेखील तक्रारींची गंभीर दखल घेत धर्मादाय आयुक्त व उपायुक्तांच्या नावे 2 जून – जुलै 2022 रोजी पत्र जारी करून निर्णय घेण्याचे आदेश दिले.

अशी बनवली बनावट कागदपत्रे

रानडे ट्रस्टची 16 एकर जमीन बळकवण्यासाठी मिलिंद देशमुख यांनी रचलेला डाव त्यांच्याच सदस्यांनी उधळून लावल्याचे समोर आले. देशमुख यांनी 2006-07 च्या दरम्यान तत्कालीन अध्यक्ष आत्मानंद मिश्रा यांच्या खोट्या सह्या केल्या होत्या. तसेच 1990 च्या काळात आर. जी. काकडे सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटीचे अध्यक्ष असताना त्यांच्या कोर्‍या लेटरहेडवर सह्या घेऊन त्याचा गैरवापर केल्याचे समोर आले होते. याच कागदपत्रांच्या आधारे तहसीलदारांना नोटरी करून बनावट कागदपत्र दिल्याचा आरोप सुनील भिडे यांनी अर्जात केलेला आहे. या प्रकरणी त्यांनी तत्काळ संबंधित पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली होती.

मिश्रांनी दिली कबुली

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटीचे माजी अध्यक्ष विद्यमान उपाध्यक्ष असलेल्या आत्मानंद मिश्रा यांनी 9 जून 2022 रोजी संस्थेच्या लेटरहेडवर सुनील भिडे यांच्या नावे पत्र जारी केले. त्या पत्रात असे नमूद केले की, तहसीलदार हवेली यांच्या नावे लिहिलेले मराठी पत्र मला समजलेले नाही. त्या पत्राचा माझा संबंध नसून त्यासाठी वाटलं तर आपण फॉरेन्सिक लॅबच्या चाचणीची मदत घेऊ शकता, अशी कबुली देऊन मला यात फसवण्याचा डाव होता की काय? अशी शंकाही व्यक्त केली होती.

उत्तर प्रदेशातील जमीन विल्हेवाट उघडकीस

उत्तर प्रदेशातील अलाहाबाद या सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटीच्या शाखेत अशाच प्रकारे वरिष्ठ सदस्य प्रेम कृष्ण द्विवेदी यांनी परस्पर सोसायटीची शेत जमीन विकून स्वतःसाठी त्याचा पैसा वापरल्याचे समोर आले आहे. हे करताना त्यांनी धर्मदाय आयुक्तांची कोणतीही परवानगी घेतली नव्हती. मिलिंद देशमुख संस्थेचे सचिव असताना त्यांनीही या जमीन विक्रीबाबत कुठलीही माहिती सोसायटीच्या रेकॉर्डवर येऊ दिली नाही. मात्र, सुनील भिडे यांच्या तक्रारीमुळे जागे झालेल्या सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटीचे इतर सदस्य देशमुख यांच्या कृतीवर 'जैसी करणी वैसी भरणी' या तत्त्वावर असल्याची चर्चा पुढे येत आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news