बोगस बियाणे विक्री प्रकरणाची सिबीआय चौकशी करा : खासदार रामदास तडस यांची लोकसभेत मागणी  | पुढारी

बोगस बियाणे विक्री प्रकरणाची सिबीआय चौकशी करा : खासदार रामदास तडस यांची लोकसभेत मागणी 

वर्धा; पुढारी वृत्तसेवा : वर्धा जिल्ह्यात उघडकीस आलेल्या बोगस बियाणे विक्री प्रकरणाची अनेक राज्यातील व्याप्ती लक्षात घेऊन शेतकर्‍यांना न्याय व आरोपींना कठोर शासन देण्याकरिता केंद्र शासनाने या विषयाची सिबीआय चौकशी करुन कार्यवाही करावी, अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी लोकसभेमध्ये केंद्रीय कृषी मंत्री यांच्याकडे लावून धरली.

बोगस बियाणे गंभीर प्रकरण उघडकीस आल्यानंतर शेतकर्‍यांना न्याय देण्याकरिता सदर विषय संसदेत उपस्थित करण्याचे खासदार रामदास तडस यांनी जाहीर केले होते. त्यानुसार २४ जुलै रोजी हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. वर्धा पोलीस आणि कृषी विभागाने कापूस बियाण्यांच्या काळाबाजाराचा मोठा खुलासा केला आहे. वर्धा जिल्ह्यातील एका गोदामावर छापा टाकण्यात आला. त्यामध्ये २९६ पोती बनावट कापूस बियाणे जप्त करण्यात आल्याचा आरोप आहे. त्याची बाजारभाव किंमत सुमारे १ कोटी ५५ लाख ८५ हजार ९७० रुपये पोलिसांनी जप्त केली आहे. बाहेरील राज्यातून येणार्‍या कंपनीच्या बियाणांच्या पाकिटांमध्ये बनावट बियाण्यांचे पॅकिंग करून कापसाचे बियाणे विकल्या जात होते. १४ टन बनावट बियाणे विकले आहे. या बनावट कापसाच्या बियाण्यांमुळे विदर्भात १४ हजार एकरांवर पेरणी झाल्याचा संशय आहे. शेतकर्‍यांचे हित लक्षात घेऊन सीबीआय चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी जेणेकरून पुन्हा असे गैरकृत्य करण्याचा विचार कोणी करू नये, अशी मागणी लोकसभेत नियम ३७७ अंतर्गत कृषिमंत्री यांना खासदार रामदास तडस यांनी केली असल्याची माहिती देण्यात आली.
शेतकर्‍यांचे झालेले नुकसान व शेतकर्‍यांसोबत झालेली दगाबाजी सहन न होण्यासारखी आहे. शेतकरी अत्यंत विश्वासाने नियोजनपुर्वक बियाणे खरेदी करीत असतो, परंतु समाजातील काही प्रवृत्ती शेतकर्‍यांना दगा देत असतील तर त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहीजे, अशी प्रतिक्रीया खासदार रामदास तडस यांनी यावेळी दिली.

Back to top button