Nashik : त्र्यंबकनगरीत घ्या पर्यटनासह धार्मिक यात्रेचा दुहेरी आनंद; काय आहे पाहाण्यासारखं…? | पुढारी

Nashik : त्र्यंबकनगरीत घ्या पर्यटनासह धार्मिक यात्रेचा दुहेरी आनंद; काय आहे पाहाण्यासारखं...?

ञ्यंबकेश्वर : देवयानी ढोन्नर

महादेवाच्या अस्तित्वखुणा जपणारा आणि गोदावरीचे उगमस्थान असलेला ब्रह्मगिरी पर्वत… हनुमानाचे जन्मस्थान अंजनेरी आणि तत्सम विविध पर्वतांच्या रांगांमुळे पावसाचे माहेरघर असलेल्या त्र्यंबकेश्वरला खळाळते धबधबे पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. भरपावसात ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा मारण्यासाठी श्रावण महिन्यात येथे देशभरातून लाखो भाविक हजेरी लावतात. त्यामुळे परिसराला वर्षासहलीसाठी ओळखले जाते.

काय पहाल

ञ्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले आद्य ज्योतिर्लिंग आहे. येथे साक्षात शिवस्वरूप ब्रह्मगिरी तेथे उगम पावलेली दक्षिण गंगा-गोदावरी आणि त्या अनुषंगाने हजारो वर्षांचा इतिहास असलेली ञ्यंबकनगरी भाविक पर्यटकांना आकर्षित करते. पावसाळ्यात ब्रह्मगिरी चोहोबाजूने बहरतो. तेथून वाहणारे शुभ्रधवल धबधबे लक्ष वेधून घेतात. ञ्यंबकेश्वर हे पावसाचे माहेरघर समजले जाते. येथे पावसाळ्यात १५०० सेंमीपेक्षा जास्त पावसाची नोंद होत असते.

पौराणिक संदर्भ लक्षात घेतला असता गोहत्येचे पाप झाले म्हणून गौतमऋषींनी येथे तपश्चर्या केली आणि गोदावरीला भुतलावर प्रगट व्हावे लागले. ब्रह्मगिरीवर गोदावरीचे जन्मस्थान आहे. येथे साक्षात भगवान शंकराने जटा आपटल्याच्या पाषाण खुणा आहेत.इतिहास कालात ब्रह्मगिरी हा एक अभेद्य किल्ला ञ्यंबकगड म्हणून परिचित होता. येथे आजही दारूगोळा भांडार, कडेलोट असे किल्ल्याचे वैशिष्टये आढळतात. छत्रपती शिवाजी महाराज सुरतेवर स्वारीला जाण्यापूर्वी ञ्यंबकेश्वर येथे आले होते. त्यांनी पूजा अभिषेक केला होता, असे येथील पुरोहितांच्या नामावळीत उल्लेख आहेत.

ञ्यंबकेश्वर मंदिराचा जीर्णोध्दार श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी सन 1755 मध्ये सुरू केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी तो पूर्ण केला. त्यांचे सरदार रावबहाद्दूर पारनेरकर यांनी कुशावर्त घाट बांधला. ञ्यंबकेश्वर मंदिराचे वास्तुशिल्प डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. प्रशस्त अशा जागेवर असलेले हे शिवमंदिर येथे आलेल्या भाविक पर्यटकांना भेट दिल्याचे समाधान देणारे आहे.

कुशावर्त घाटात गोदावरी अडवली अशी आख्यायिका आहे. या कुशावर्तात समुद्रमंथनात मिळालेल्या अमृताचे थेंब पडले म्हणून येथे दर १२ वर्षांनी साधुंचा कुंभमेळा भरतो. कुशावर्त घाटाची शिल्पकला अप्रतिम अशी आहे.ब्रह्मगिरीवर पर्वतावर गंगा-गोदावरीचे उगमस्थान आहे. येथे श्री चक्रधरस्वामी यांचे स्थान आहे. पर्वतावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. जवळच गंगाद्वार आहे येथे जाण्यासाठी 750 पायऱ्या आहेत. येथे गोरक्षनाथ यांनी तप केले ती गुंफा आहे.

ब्रह्मगिरीच्या पायथ्याला ज्ञानेश्वर माउलींचे थोरले बंधू आणि गुरू संत निवृत्तिनाथ महाराज यांनी संजीवन समाधी घेतली ते स्थान आहे.जवळच संत जनार्दनस्वामी यांचा आश्रम आहे. येथे लाल दगडात बांधलेले ह्दयेश्वर महादेव मंदिर आहे. संत गजानन महाराज मंदिर आणि श्री स्वामी समर्थ गुरुपीठ शहराच्या प्रवेशद्वारी आहेत. पावसाळ्यात ञ्यंबकेश्वर शहर आणि परिसराला बहर आलेला असतो. येथे आले असता जवळच असलेले पहिने बारी, हरिहर किल्ला, दुगारवाडी धबधबा या ठिकाणी भेट देता येते.

निवास व्यवस्था 

संत गजानन महाराज शेगाव संस्थान यांनी 200 खोल्यांच्या निवास सुविधा केल्या आहेत.तीन तारांकित हॉटेल आहे. विविध समाजाच्या धर्मशाळा आहेत.

कसे याल मुंबई-ञ्यंबकेश्वर

मुंबई येथून महामार्ग क्रमांक 3 या रस्त्याने प्रवास करत घोटी येथून बायपास आहे. म्हसुर्लीमार्गे जवळचा रस्ता आहे. मुंबई-त्र्यंबक २०० किमी अंतर आहे.नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर नाशिक मध्यवर्ती बसस्थानक रिक्षा अथवा बस व तेथून ञ्यंबकेश्वर 30 किलोमीटर आहे. नाशिक-ञ्यंबक अशा दर पाच-दहा मिनिटांला बस सुरू असतात.

हेही वाचा : 

Back to top button