पुढारी ऑनलाईन:Manipur Women Assault Video: मणिपूरमध्ये जमावाकडून दोन महिलांना नग्न करून परेड केल्याचा व्हिडिओ पाहून देशात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे मणिपूरमध्ये पुन्हा संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी हुइरेम हेरोदास मेतेई याचे घर येथील संतप्त महिलांच्या गटांकडून जाळण्यात आले. तसेच भविष्यात देखील असे घृणास्पद कृत्य होऊ नये यासाठी सरकारने याप्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी येथील संतप्त महिला गटांकडून करण्यात येत आहे.
मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी गुरुवारी (दि.२१ जुलै) जाहीर केले की, या प्रकरणातील मुख्य आरोपीसह आणखी तीन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. मणिपूर महिला अत्याचार व्हिडिओ प्रकरणी पोलिसांनी थौबल जिल्ह्यातील हुइरेम हेरोदास मेतेई नावाच्या 32 वर्षीय मुख्य आरोपीला अटक केली आहे. तसेच काल (दि.२० जुलै) रात्री 9 पर्यंत तिघांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आणखी एकाला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती मणिपूर पोलिसांनी (Manipur Women Assault Video ) ट्विट करून दिली आहे.
मणिपूरमध्ये ही घटना घडून तब्बल ७० दिवस उलटून गेले. तरी देखील यावर कारवाई करण्यात आलेली नव्हती. हा व्हिडिओ व्हायरल होताच, या घटनेचे देशभारात पडसाद उमटले. यानंतर प्रशासनाला जाग येऊन पोलिसांनी धडक कारवाई करण्यास सुरूवात केली. परंतु गुन्हेगारांवर कारवाई करण्यात मोठी दिरंगाई झाल्याने येथील पोलिसांवर देखील टीका होत आहे. या घटनेचे पडसाद मणिपूरसह देशभरात उमटताना (Manipur Women Assault Video) दिसत आहेत.
मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी दिलेल्या माहितीत मोठा खुलासा केला. ते म्हणाले की, दोन महिलांची विवस्त्र धिंड आणि त्यांच्यावरील अत्याचार प्रकरणी मुख्य गुन्हेगारासह आणखी ३ आरोपींना अटक करण्यात आले आहे. हुइरेम हेरोदास मेईती (वय ३२) असे मुख्य आरोपीचे नाव असून त्याला थौबल जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. तर इतर आरोपींनाही पकडण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री सिंह पुढे म्हणाले की, पोलिसांनी थौबल जिल्ह्यातील नॉन्गपोक सेकमाई पोलिस ठाण्यात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली रात्रभर छापे टाकून गुन्हेगारांना लवकरात लवकर पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, घटनेच्या पार्श्वभूमीवर, गावकऱ्यांनी आरोपी हुइरेम हेरोदास मेईती याच्या घराला आग लावली आणि त्याच्या कुटुंबालाही बहिष्कृत केले असल्याचे त्यांनी सांगितले.
मणिपूरमध्ये 3 मे रोजी जातीय हिंसाचार सुरू झाल्यापासून 150 हून अधिक लोक ठार झाले आहेत आणि अनेक जखमी झाले आहेत, जेव्हा मेतेई समुदायाच्या अनुसूचित जमाती (एसटी) दर्जाच्या मागणीच्या निषेधार्थ डोंगराळ जिल्ह्यांमध्ये 'आदिवासी एकता मार्च' आयोजित करण्यात आला होता. या दरम्यान जातिय हिंसाचर उसळला होता. त्यानंतर सतत मणिपूर धुमसतच आहे. मणिपूरच्या एकूण लोकसंख्येपैकी मेतई समुदायाची लोकसंख्या सुमारे 53 टक्के आहे आणि ते मुख्यतः इम्फाळ खोऱ्यात राहतात. तर या जमातीतील आदिवासी ज्यात नागा आणि कुकी यांचा समावेश आहे. ते 40 टक्के आहेत आणि ते बहुतेक डोंगराळ जिल्ह्यांमध्ये राहतात.