राहुरीचे पीएसआय सज्जन नर्‍हेडा गुन्हा दाखल होताच पसार | पुढारी

राहुरीचे पीएसआय सज्जन नर्‍हेडा गुन्हा दाखल होताच पसार

राहुरी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सज्जन नर्‍हेडा यांच्यावर विवाहीतेवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाल्याने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली. गुन्हा दाखल होताच नर्‍हेडा फरार झाला असून पोलिस प्रशासनाच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तालुक्यातील एका विवाहीत महिला जमिन खरेदी प्रकरणात फसवणूक झाल्याने न्याय मागण्यासाठी पीएसआय नर्‍हेडा यांच्याकडे आली होती.

मोबाईल संपर्काद्वारे नर्‍हेडा याने तपास केल्यास पैशासह मला अजून काय मिळणार? अशी मागणी घातली. व्यथित झालेल्या महिलेने जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात तक्रार दाखल केली. वरिष्ठांकडे तक्रार का केली? अशी विचारणा करीत नर्‍हेडा याने विवाहीतेला धमकी दिली. आपल्या रूमवर नेत अत्याचार केला.

पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल होताच पीएसआय नर्‍हेडा याने धूम ठोकली आहे. यामुळे पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यापुढे तपासाचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. सज्जन नर्‍हेडाचे दुर्जन कृत्याने पोलिस प्रशासनावर काळीमा फासला गेला आहे. पीडित महिलेला न्याय देण्यासाठी पोलिसांनी कठोर पाऊले उचलावीत अशी मागणी करण्यात आली आहे.

राहुरी येथील अत्याचार प्रकरणावरून आ. प्राजक्त तनपुरे यांनी हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी भूमिका मांडली. राज्यात घटनेची निंदा होत असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नर्‍हेडा यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल होत असेल तर त्यास बडतर्फ करण्याचे आश्वासन दिलेले आहे.

अत्याचारी नर्‍हेडाला जेरबंद करा :

अत्याचारित महिलेला संरक्षण द्या, आर्थिक सहकार्य करा. नर्‍हेडाला तत्काळ अटक करा. या प्रकरणाची सखोल चौकशी करीत कठोर कारवाई करा. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू अशी मागणी आरपीआयचे तालुका अध्यक्ष विलास साळवे, जिल्हा संघटक अनुसंगम शिंदे, संतोष दाभाडे, सिद्धांत सगळगिळे, राजू साळवे आदींनी केली आहे.

कोणाचीही हयगय केली जाणार नाही : जाधव

पोलिस उपनिरीक्षक सज्जन नर्‍हेडा प्रकरणात गय केली जाणार नाही. दोन पथके नर्‍हेडाच्या शोधासाठी रवाना आहे. लवकरच अटक केली जाणार आहे. पीडित महिलेला न्याय देऊ असे आश्वासन पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी सांगितले.

हेही वाचा

डेंग्यू : दक्षता आणि उपचार

संकरीत गाईच्या माध्यमातून थारपारकर जातीच्या कालवडीचा जन्म

किनार्‍यावर आला महाकाय सागरी साप

Back to top button