नाशिक : धरणसाठ्यात यंदा चार टक्के तूट, प्रमुख प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांहून कमी पाणी | पुढारी

नाशिक : धरणसाठ्यात यंदा चार टक्के तूट, प्रमुख प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांहून कमी पाणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यात सर्वत्र चिंतेचे ढग जमा झालेले असताना धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नाही. जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पांमध्ये सध्या २७ टक्के उपयुक्त साठा शिल्लक असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत साठ्यात ४ टक्के तूट आहे.

जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपुष्टात आला असताना जिल्ह्यात चांगला पाऊस झालेला नाही. विशेष करून पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर नसल्याने प्रमुख धरणांमध्ये मर्यादित पाणीसाठा शिल्लक आहे. प्रमुख २४ प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत १८ हजार दलघफू साठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच काळात हा साठा २०,६२४ दलघफू म्हणजे ३१ टक्के इतका होता. तिसगाव, माणिकपुंज व नागासाक्या कोरडेठाक पडले आहेत. नांदूरमध्यमेश्वर वगळता उर्वरित सर्व प्रकल्प निम्मीही भरलेली नाहीत. त्यामुळे जिल्ह्याच्या दृष्टीने ही चिंताजनक बाब आहे.

नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ३२ टक्के भरले आहे. तर समूहातील चारही प्रकल्प मिळून अवघा २३ टक्के साठा शिल्लक आहे. इगतपुरी व परिसरात गत काही दिवसांत झालेल्या पावसामुळे दारणा धरण समूहातील प्रकल्पांना संजीवनी मिळाली आहे. समूहातील सहा प्रकल्पांत मिळून ७ हजार ७८९ दलघफू पाणी उपलब्ध असून, त्याचे प्रमाण ४१ टक्के आहे. पालखेड समूहात अवघा १५ टक्के म्हणजेच १२८५ दलघफू पाणी आहे. ओझरखेड समूहामध्ये ५९५ दलघफू (१९ टक्के) उपयुक्त साठा शिल्लक आहे. गिरणा खोऱ्यात चणकापूर समूहातील पाच प्रकल्प मिळून साठा ५ हजार ३५२ दलघफू असून, त्याचे प्रमाण २३ टक्के आहे. याशिवाय पुनदमध्ये ५९३ दलघफू (३६ टक्के) पाणी शिल्लक आहे.

….तर पाणीसंकट

अलनिनोच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून ३१ ऑगस्टपर्यंत धरणांमधील पाण्याचे नियोजन करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, पावसाचा लहरीपणा कायम राहिल्यास येत्या काळात जिल्ह्यावरील पाणीसंकट तीव्र होऊ शकते.

धरणसाठा (दलघफू)

गंगापूर १८०१, दारणा २९८६, काश्यपी ३००, गाैतमी-गोदावरी २३२, आळंदी १४, पालखेड २१५, करंजवण ८६१, वाघाड २०९, ओझरखेड ५२६, पुणेगाव ६९, भावली ६६०, मुकणे ३३४९, वालदेवी २१७, कडवा ३६७, नांदूरमध्यमेश्वर २०१, चणकापूर ९४१, हरणबारी ४९९, केळझर २०३, गिरणा ३७०९, पुनद ५९३.

हेही वाचा : 

Back to top button