नेपाळमध्ये आज रुद्राक्ष लिंगार्चन सोहळा | पुढारी

नेपाळमध्ये आज रुद्राक्ष लिंगार्चन सोहळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाच्या वतीने शनिवारी (दि. १०) नेपाळमध्ये काठमांडू महानगरात ‘श्री अतिरुद्रात्मक रुद्राक्ष लिंगार्चन व श्री ललिता सहस्रनाम पठण’ सोहळा होत असून, या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला गुरुमाउली अण्णासाहेब मोरे आणि सेवामार्गाचे देशविदेश अभियान प्रमुख नितीनभाऊ मोरे हे नेपाळमध्ये पोहोचले आहेत.

नेपाळ येथील गोदावरी सेवा केंद्राच्या स्थानिक महिला-पुरुष सेवेकऱ्यांनी मोठया भक्तिभावाने व पारंपरिक पद्धतीने गुरुमाउलींचे भव्य स्वागत केले. त्यानंतर परमपूज्य गुरुमाउलींनी उत्तर गोदावरी तीर्थ येथील गंगापूजन केले. गुरुमाउलींनी तयारीचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या. या सोहळ्यासाठी भारत आणि नेपाळमधून हजारो सेवेकरी शुक्रवारीच पोहोचले आहेत. दिवसभर भगवान पशुपतिनाथ आणि पंचक्रोशीतील विविध धार्मिक स्थळांवर महिला, पुरुष सेवेकरी आणि भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे दिसून आले.

शनिवारी (दि. 10) सकाळी 8 ला भूपाळी, आरतीने सोहळ्यास प्रारंभ होईल. 8.30 ते 10.30 पर्यंत मुख्य लिंगार्चन आणि ललिता सहस्रनाम पठणाचा कार्यक्रम होईल. 10.30 वाजता व्यासपीठावर गुरुमाउलींचे आगमन होईल. त्यानंतर मान्यवर दीपप्रज्वलन करून मनोगत व्यक्त करतील. मान्यवरांमध्ये नेपाळच्या उपराष्ट्रपतींचाही समावेश आहे. यानंतर गुरुमाउली हितगुज करतील. यानंतर महाप्रसाद होईल. या सोहळ्याचा सर्वांनी मनमुराद आनंद घ्यावा आणि सोहळा अविस्मरणीय करावा, असे आवाहन नितीनभाऊ मोरे यांनी केले आहे. हा सोहळासुद्धा या लौकिकास साजेसा असाच होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

एक लाख रुद्राक्षांची अकरा फूट उंच पिंड 

या अत्युच्च सेवेसाठी कार्यक्रमस्थळ सज्ज झाले असून, एक लाखापेक्षा अधिक रुद्राक्षांची अकरा फूट उंच भव्य पिंड बनविण्यात आली आहे. यज्ञयाग विभागातील सेवेकरी ही पिंड बनविण्याचे काम गेली अनेक दिवस करत होते.

हेही वाचा :

Back to top button