रस्त्याचे रुंदीकरण झाले, मात्र वाहतूक कोंडी कायम! एरंडवणेतील स्थिती

कोथरूड(पुणे); पुढारी वृत्तसेवा : एरंडवणे येथील म्हात्रे पुलाजवळील रजपूत झोपडपट्टीतून जाणारा रस्ता सहा महिन्यांपूर्वी वाहतुकीसाठी खुला झाला आहे. परंतु, वाहतूक कोंडीची समस्या कायम असल्याचे चित्र दिसून आहे. या ठिकाणी रस्त्याचे रुंदीकरण झाले आहे. मात्र, या रस्त्यावर मोठ्या वाहनांची रहदारी वाढल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे नागरिकांनी सांगितले.
नदीपात्रातील शिवणे-खराडी रस्त्यापैकी डेक्कन चौपाटी ते म्हात्रे पुलाजवळील रजपूत झोपडपट्टी हा दोन किलोमीटर लांबीचा नदीकाठचा रस्ता महापालिकेने विकसित केला आहे. नदीपात्रापासून डेक्कनहून म्हात्रे पुलाकडे जाणारा रस्ता रजपूत झोपडपट्टी परिसरातून जातो. या परिसरातील शंभर मीटर अंतरात काही झोपड्या आणि काही बैठी घरे होती. या भागात सातत्याने वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाची मागणी सातत्याने होत होती. गेल्या दहा वर्षांपासूनही भूसंपादनाची आणि पुनर्वसनाची प्रक्रिया रखडली होती. मात्र, महापालिकेने 36 मिळकतधारकांचे पुनर्वसन करून या रस्त्याचे रुंदीकरण केले आहे.
मिळकती पाडून विकसित केलेल्या रस्त्याच्या पुढे नदीपात्राकडे जाणारा रस्ता थोडासा रुंद केला आहे. या ठिकाणी फक्त दुचाकीच वाहने जावे, यासाठी दुभाजक व चौकटी कमान पूर्वीच उभारण्यात आली होती. यामुळे दुचाकी वाहने ये-जा करत होती. सध्या या चौकटीच्या शेजारील रस्ता खुला झाला असल्याने मोठी वाहनेदेखील या रस्त्यावरून ये-जा करीत आहेत, यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी कमी पडत असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. ही समस्या निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालक व नागरिकांकडून होत आहे.
हेही वाचा
दहशतवादी संघटनांशी संबंध; एका परदेशी नागरिकासह चौघांना अटक
पुणे-पानशेत रस्ता खचला ! पावसाळ्यात तब्बल 60 गावांचा संपर्क तुटण्याची भीती