नाशिकरोडला छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त अभिवादन | पुढारी

नाशिकरोडला छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त अभिवादन

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

भारतीय समाज रचना ही वर्ण व्यवस्थेने पूर्णपणे बुरसटलेली होती. अशा मागास विचारधारेमुळे बहुजन समाज रसातळाला गेला होता. उन्नतीचे सर्व मार्ग, कर्मकांड आणि मानव विरोधी तत्वज्ञानाचे बंद केले होते. अशा वेळी छत्रपती शाहू महाराज यांनी शिक्षण, उद्योग, व्यवसाय व नवे कृषी धोरण निर्माण करून बहुजन समाज उभा करण्याचे दिव्य कार्य केले, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभ्यासक अशोक सोनवणे यांनी केले.

देवळाली कॅम्प येथील श्रीमती विमालाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात शनिवारी (दि. ६) छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष समारोप व स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी सोनवणे बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शालेय समितीचे अध्यक्ष विलास धुर्जड उपस्थित होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. एस. एस. काळे, उपप्राचार्य डी. टी. जाधव होते. अशोक सोनवणे म्हणाले की, मागासवर्गीयांना देशात पहिल्यांदाच नोकरीत आरक्षण देणारा पहिला राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज होते. सत्यशोधक जलसे त्यांनी सुरू केले. या माध्यामातून शेतकरी वर्गाने जागरूक होऊन स्वत:च्या हितासाठी आंदोलन सुरू केले. त्याची दखल रशियाचे तत्कालीन अध्यक्ष स्टॅलिन यांनी घेतली. शाहू महाराज लोककल्याणकारी राजे होते, बहुजन समाजातील तळागाळातील जनतेसाठी शिक्षण, नोकऱ्या, रोजगार उपलब्ध करून देत शेवटच्या श्वासापर्यंत जनतेसाठी झटत राहिले. छत्रपती शाहू महाराज यांनी शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान दिले. मानवतावादी विचार त्यांनी दिला. शाहू, फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र म्हणजे मानवतावादी विचारांचा महाराष्ट्र असे मानले जात असून सध्यस्थितीत महाराष्ट्र तसा हवा असल्याचे त्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास धुर्जड यांनी छत्रपती शाहू महाराज यांचा विचार सर्वांनी अंगिकरायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रास्तविकेत प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांनी शाहू महाराज महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतीशील विचारांचे पाईक होते, सांगितले. डॉ. जयश्री जाधव यांनी सुत्रसंचलन केले. उपप्राचार्य डॉ. डी. टी. जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शिक्षणावर जास्तीत जास्त पैसे खर्च
जग कळायचे असेल तर शिकले पाहिजे, त्यासाठी शाहू महाराज यांनी सर्वांना शिक्षण दिले, वसतीगृह निर्माण करुन गाव-खेड्यातील विद्यार्थ्यांची सोय निर्माण केले. तिजोरीतील जास्तीत जास्त पैसा शिक्षणासाठी खर्च केल्याचे सोनवणे यांनी सांगितले.

हेही वाचा:

Back to top button