नाशिक : सोयगावी पाइपलाइन गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया | पुढारी

नाशिक : सोयगावी पाइपलाइन गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा
शहरातील सोयगाव मराठी शाळेजवळील मुख्य रस्त्यावर गेल्या कित्येक दिवासांपासून पाणीगळती होत असून, दिवसाकाठी हजारो लिटर पाणी वाया जात आहे. मोठ्या प्रमाणावर होत असलेली ही पाणीगळती नागरिकांनी अनेक वेळा महानगरपालिकेच्या निदर्शनास आणून दिली असूनही अद्याप उपाययोजना करण्यात आलेली नाही.

उन्हाळा सुरू असून, तालुक्यातील काही गावे पिण्याचे पाणी मिळावे म्हणून टाहो फोडत असताना दुसरीकडे शहरात मोठ्या प्रमाणावर पिण्याचे पाणी वाया जात आहे. तालुक्यातील मेहुणे गावी गेल्या दीड महिन्यापासून 56 खेडी योजनेचे, पिण्याचे पाणी ग्रामस्थांना मिळालेले नाही. त्यामुळे त्यांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. टेहरे चौफुली ते चर्चगेट सिमेंट काँक्रिटीकरण होत असताना या ठिकाणी असलेल्या पाइपलाइनला धक्का लागून पाणीगळतीला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी पाणीगळती होत असल्याचे परिसरातील नागरिकांनी या समस्या महानगरपालिका प्रशासनास निदर्शनास आणून दिली. मात्र, महानगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे. पाणीगळतीमुळे 14 कोटी खर्चून बनलेल्या रस्त्याची दुर्दशा होण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणात होत असलेली या गळतीचे पाणी वाहून मोकळ्या प्लॉटवर साचू लागले आहे. त्यामुळे डासांची संख्या वाढून रोगराईला आमंत्रण मिळू लागले आहे. सिमेंट काँक्रीटचा रस्ता बनल्याने ही पाणीगळती रोखण्यासाठी आता या नवीन बनवलेला रस्ता खोदून पाणीगळती थांबवावी लागणार आहे. महानगरपालिकेत प्रशासक राज असल्याने कोणीही या समस्येवर लक्ष घालण्यास तयार नाही. भविष्यात अशीच पाणीगळती होत राहिल्यास लाखो लिटर पिण्याच्या शुद्ध पाण्याचा अपव्यय होतच राहणार आहे. महानगरपालिकेने तत्काळ पाणीगळतीची समस्या कायमस्वरूपी मार्गी लावावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा:

Back to top button