पुण्यातील कचरा व्यवस्थापनाची परदेशी पाहुण्यांना भुरळ | पुढारी

पुण्यातील कचरा व्यवस्थापनाची परदेशी पाहुण्यांना भुरळ

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या देवाची उरुळी आणि फुरसुंगी येथील कचरा डेपोमधील बायोमायनिंग, कचरा प्रक्रिया प्रकल्प, कचरा कॅपिंग आणि वृक्षारोपण करण्यात आलेल्या प्रकल्पांना बुधवारी विविध 18 देशांच्या प्रतिनिधींनी भेट देऊन पाहणी केली.
स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत कचरा व्यवस्थापनाची माहिती घेण्यासाठी भारतभेटीवर आलेल्या 18 देशांच्या प्रतिनिधींनी पुणे महापालिकेच्या प्रकल्पाची निवड केली.

18 देशांच्या प्रतिनिधींमध्ये 14 प्रतिनिधी हे आफ्रिकेतील विविध 14 देशांचे होते, तर आशियामधील बांग्लादेश, नेपाळ, श्रीलंका आणि भूतानच्या प्रतिनिधींचा यामध्ये समावेश होता. दोन दिवसांच्या पुणेभेटीवर आलेल्या या प्रतिनिधींनी घरोघरी जाऊन ओला व सुका कचरा गोळा करणे, त्याची प्रक्रिया प्रकल्पांपर्यंत वाहतूक तसेच प्रत्यक्ष प्रक्रिया प्रकल्प आणि जुन्या साठलेल्या कचर्‍यावरील बायोमायनिंग प्रक्रिया, या प्रकल्पांतून होणारी सेंद्रिय खतनिर्मितीची माहिती घेतली. कचरा गोळा करण्यापासून त्यावरील प्रक्रियेसाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचे या प्रतिनिधींनी कौतुक केल्याची माहिती पालिकेच्या अधिकार्‍यांनी दिली.

Back to top button