नाशिक : नांदगाव तालुक्यातील रिक्त ग्रामपंचायत सदस्यपदासाठी १८ मे ला मतदान | पुढारी

नाशिक : नांदगाव तालुक्यातील रिक्त ग्रामपंचायत सदस्यपदासाठी १८ मे ला मतदान

नाशिक (नांदगांव) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीत रिक्त असलेल्या सदस्य पदांच्या जागेसाठी गुरुवार दिनांक १८ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तालुक्यातील बोलठाण, कळमदरी, फुलेनगर व टाकळी खुर्द या ग्रामपंचायतीत रिक्त असलेल्या सदस्य पदांच्या जागेचा समावेश आहे.

बोलठाण येथील प्रभाग क्रमांक ५ मधील ना मा प्र वर्ग महिला राखीव, कळमदरी प्रभाग क्रमांक ३ मधील सर्वसाधारण महिला राखीव, फुलेनगर येथील प्रभाग क्रमांक १ मध्ये अनुसूचित जमाती महिला राखीव तर प्रभाग क्रमांक ३ मधील अनुसूचित जमाती तसेच टाकळी खुर्द येथील प्रभाग क्रमांक एक मधील अनुसूचित जमाती महिला राखीव रिक्त असलेल्या जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. कळमदरी येथील प्रभाग क्र. ३ मधील सर्वसाधारण स्त्री या जागेसाठी मालेगाव तालुका प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष शेखर पगार यांच्या सौभाग्यवती सुवर्णा पगार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ग्रामपंचायत उपसरपंच अनिता पगार यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मंगळवार (दि.२) रोजी शेवटचा दिवस असल्याने सुवर्णा पगार यांनी शेखर पगार, सरपंच मनोज पगार, माजी सरपंच देविदास पगार, विशाल पगार, नाना पगार, दीपक पगार, संजय पगार, हरी देसले, समाधान पगार, हितेंद्र पगार, सुनील पगार आदींच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.

अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी निर्धारित वेळेपर्यंत पगार यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने सुवर्णा पगार यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग देखील मोकळा झाला. बोलठाण ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या एका जागेसाठी सरिता विजय हरबोले, पल्लवी दिलीप रिंढे, वर्षा गणेश बचाटे, अपेक्षा दादासाहेब रिंढे या ४ उमेदवारांनी तर कळमदरी ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी सुवर्णा शेखर पगार यांचा तर फुलेंनगर ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र ३ मधील एका जागेसाठी राहुल सोमनाथ गायकवाड यांच्या एकमेव अर्ज आले. तर फुलेनगर येथील प्रभाग क्र १ आणि टाकळी खु. ग्रामपंचायत प्रभाग क्र १ मधील रिक्त असलेल्या एका जागेसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने या जागा पुन्हा एकदा रिक्त राहणार आहे.

हेही वाचा:

Back to top button