शरद पवारांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर बारामतीत सन्नाटा, पदाधिकारी- कार्यकर्ते सैरभैर | पुढारी

शरद पवारांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर बारामतीत सन्नाटा, पदाधिकारी- कार्यकर्ते सैरभैर

बारामती (पुणे), पुढारी वृत्तसेवा: राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा खासदार शरद पवार यांनी राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर बारामतीत सन्नाटा पसरला आहे. पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पवार यांच्या भूमिकेचे समर्थन केल्याने बारामतीत पदाधिकाऱ्यांना कोणती भूमिका घ्यावी, असा प्रश्न पडला आहे. सोशल मिडियावर मात्र पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी आग्रही भूमिका मांडली जात आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार यांनी घेतलेली भूमिका पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांना धक्का देणारी ठरली. अनेकानी वाहिन्यांवर हा कार्यक्रम पाहिला. त्यानंतर पदाधिकारी, कार्यकर्त्याना धक्का बसला. बारामतीत मंगळवारी बारामती बँकेच्या उपाध्यक्षपदाची निवड सुरु असतानाच हे वृत्त येऊन धडकले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मात्र पवार यांच्या भूमिकेचे समर्थन केले. त्यामुळे येथील पदाधिकारी – कार्यकर्ते कोणती भूमिका घ्यावी, याबाबत संभ्रमित झाल्याचे दिसून आले.

सोशल मिडियावर मात्र कार्यकर्ते मनमोकळेपणाने व्यक्त झाले. राजकीय जीवनात पवार यांचा अनुभव पक्षाला ताकद देत आला आहे. त्यामुळे साहेब तुम्ही राजीनामा मागे घ्या, अशा विनवणीच्या पोस्ट सोशल मिडियावर सुरु होत्या. लोक भावनेचा विचार करुन साहेब आपला राजीनामा मागे घेतील, अशी आशा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

Back to top button