नाशिक : मद्यपी हल्लेखोरांकडून पंक्चर दुकानदाराचा खून | पुढारी

नाशिक : मद्यपी हल्लेखोरांकडून पंक्चर दुकानदाराचा खून

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

संभाजी नगर रोडवरील टाकळी गावाकडे जाणाऱ्या तपोवन-जेजुरकर मळा रस्त्यावर वाहनात हवा भरून दिली नाही. या कारणावरून पंक्चर दुकानदारावर तीक्ष्ण हत्याराने चौघा हल्लेखोरांनी हल्ला करून त्यास भोसकून ठार मारल्याची घटना शनिवारी (दि. २९) रात्री घडली. या घटनेने शहर पुन्हा हादरले असुन शहरातील गेल्या तीन दिवसांत खुनाची ही दुसरी घटना आहे.

वाहनात हवा भरण्यासाठी आलेल्या मद्यधुंद हल्लेखोरांनी पंक्चर दुकानदाराच्या छातीत धारदार शस्त्राने भोसकून त्याचा खून केला. या हल्ल्यात मूळ बिहारचा रहिवासी गुलाम मोहम्मद रब्बानी (२५) याचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर संशयित फरार झाले होते, मात्र त्यातील तिघा संशयितांना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या संशयितांमध्ये यश पवार, प्रसाद पवार व एका विधी संघर्षित बालकाचा समावेश असल्याचे समजते. तर विजय पाटील नामक संशयित फरार झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. संभाजीनगर रोडवरील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी चौक (हॉटेल मिरची) ते टाकळी रोडकडे जाणाऱ्या जेजुरकर लॉन्स ते रिंगरोडवर साई मोटार गॅरेज आहे. या गॅरेजबाहेर गुलाम रब्बानी याचे पंक्चर दुकान आहे. हल्लेखोरांनी त्याच्यावर वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त परिमंडळ – १ डॉ. किरणकुमार चव्हाण, पोलिस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) वसंत मोरे, सहायक पोलिस आयुक्त डॉ सिद्धेश्र्वर धुमाळ, आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख, गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, संतोष शिंदे, भास्कर वाढवणे, सुरेश नरवडे, कुंदन राठोड, शरदचंद्र काटकर, दादासाहेब वाघ, दिनेश गुंबाडे, निखिल वाघचौरे, सचिन बाहिकर, सुरंजे, शिवाजी आव्हाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास आडगाव पोलीस करीत आहे.

हल्ला करून संशयितांचा पळ
हल्लेखोरांनी गुलाम रब्बानी याला मारहाण करत असताना रस्त्याने जाणाऱ्या काहींनी ही घटना बघितली. संशयितांनी गुलाम याच्यावर हल्ला केला तेव्हा आरडा ओरड सुरू होती. त्या दरम्यान संशयित दुचाकीवरून पळाल्याची चर्चा होती. पोलिसानी तपासाची चक्रे वेगाने फिरवत तिघांना ताब्यात घेतले.

हेही वाचा:

Back to top button