मोरगाव : मोगरा उत्पादक शेतकरी चिंतेत | पुढारी

मोरगाव : मोगरा उत्पादक शेतकरी चिंतेत

मोरगाव (ता. बारामती); पुढारी वृत्तसेवा : मोरगाव, सुपा परिसरामध्ये फूलशेती केली जाते. त्यामध्ये मोगरा लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र, मोगर्‍याचा बहर जोमात असताना अवकाळी पाऊस, वाढती उष्णता, ढगाळ वातावरणाने शेतकर्‍यांची चिंता वाढवली आहे. कारण या हवामानामुळे मोगर्‍याच्या उत्पादनात घट झाली असून, दरातदेखील घसरण होत आहे. उत्पादन घटल्याने हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने मोगरा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.

सुपे येथील मोगर्‍याची शेती करणार्‍या विमल बारवकर यांनी सांगितले की, सुपा मळरानावरील शेतामध्ये 50 झाडे लावली आहेत. या रोपांसाठी 5 हजार रुपये मशागतीचा खर्च आला. त्यानंतर या रोपांना पाणी देणे, रोगप्रतिबंधात्मक औषधफवारणी करणे यासाठीही मोठा खर्च झाला. आता कुठे रोपांना कळ्यांचा बहर लागला तोच अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण आणि वाढती उष्णता यामुळे रोपे कोमजू लागली आहेत.

सध्या पाणीटंचाईमुळे रोपांना पाणीही मिळेनासे झाले आहे. त्यामुळे बागा जगवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. जी फुले आली ती तोडण्यासाठी मजुराला दिवसाला 250 रुपये द्यावे लागत आहे. हे काम जिकेरीचे असते, तर नंतर तोडलेल्या फुलांपासून माळा तयार कराव्या लागतात हे सुद्धा काम किचकट आहे. तर माळांची विक्री करण्यासाठी जवळच्या तिर्थक्षेत्रांवर जावे लागते. त्यासाठीचा प्रवास खर्च मोजावा लागतो. तर बाजारात विक्रीसाठी नेताना वाहनभाडे भरमसाठ भरावे लागते आणि जर फुले विकली गेली नाहीत तर ती सायंकाळपर्यंत सुकून जातात. तेव्हा ती फेकून द्यावी लागतात. मिळालेल्या उत्पन्नातून कौटुंबिक खर्च भागवत असताना मोठी कसरत होते, असेही बारवकर यांनी सांगितले.

Back to top button