दौंडला दोन्ही गटांचा झेंडा; भाजपसह आ. कुल यांचा प्रथमच प्रवेश | पुढारी

दौंडला दोन्ही गटांचा झेंडा; भाजपसह आ. कुल यांचा प्रथमच प्रवेश

खोर/दौंड; पुढारी वृत्तसेवा : दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपप्रणीत आमदार राहुल कुल व राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश थोरात यांच्या पॅनेलमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत दोन्ही पॅनेलचे समान प्रत्येकी 9 उमेदवार विजयी झाल्याने ही लढत सुटली आहे. प्रथमच आमदार राहुल कुल यांनी बाजार समितीमध्ये प्रवेश केला आहे. तब्बल 25 वर्षांपासून बाजार समिती ताब्यात ठेवलेल्या माजी आमदार रमेश थोरात यांच्या एकतर्फी सत्तेला धक्का दिला आहे.

गेल्या पंचवार्षिकमधील 18-0 आकडा मोडीत काढून 9-9 असा बरोबरीत सामना सोडविला आहे. आता बाजार समितीमध्ये होणार्‍या फोडाफोडीच्या राजकारणाचे वेध तालुक्याला लागले आहेत. आ. राहुल कुल वेगळे गणित आखून आपली सत्त्ता स्थापन करणार का? की माजी आमदार रमेश थोरात हे आ. राहुल कुल यांचे गणित मोडीत काढणार, हे पाहणे महत्त्वपूर्ण असणार आहे. असे नाही झाले, तर चिठ्ठी काढून कोणाचा सभापती होणार, हे पाहणे देखील महत्त्वपूर्ण असणार आहे.

आमदार राहुल कुल गटाचे विजयी उमेदवार : ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघ : गणेश अंकुश जगदाळे, अतुल लक्ष्मण ताकावणे. ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या दुर्बल मतदारसंघ : अशोक महादेव फरगडे, राहुल गणपत चाबूकस्वार. हमाल व तोलारी मतदारसंघ : कालिदास किसन रुपनवर. सोसायटी सर्वसाधारण मतदारसंघ : शरद बापूराव कोळपे, भारत सुखदेव खराडे, संतोष रघुनाथ आखाडे, बापूसो शिवाजी झगडे. माजी आ. रमेश थोरात गटामधील विजयी उमेदवार : व्यापारी व अडते मतदारसंघ : सुनील विश्वनाथ निंबाळकर, संपत बबनराव निंबाळकर. सोसायटी महिला राखीव मतदारसंघ : वर्षा मुकेश मोरे, गीतांजली यशवंत शिंदे. सोसायटी इतर मागास प्रवर्ग मतदारसंघ :- जीवन दत्तात्रय म्हेत्रे, बाळासाहेब मारुती शिंदे. सोसायटी सर्वसाधारण मतदारसंघ : गजिनाथ दादा आटोळे, आत्माराम साहेबराव ताकवणे, सचिन लालासो शेळके हे उमेदवार आहेत.

Back to top button