

देहूगाव (पुणे) : देहू नगरपंचायत हद्दीत काही घरांच्या छतावर तर काही खासगी जागेवर असलेले पाच ते सहा मोबाईल टॉवर अनधिकृत असून एकाही मोबाईल टॉवरची नोंद करण्यात आलेली नाही. अशा अनधिकृत मोबाईल टॉवरची माहिती देहू नगर पंचायतीच्या वतीने घेण्यात आली आहे. तसेच, अनधिकृत मोबाईल टॉवरच्या मालकांना नोटीस बजावल्या आहेत.
हे मोबाईल टॉवर रहिवासी वस्तीत असून एखादी दुर्घटना घडली, तर मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहनी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोबाईल टॉवर लावताना केलेल्या ड्रिलिंगमुळे इमारत खिळखिळी होते. तसेच, कमकुवत झालेल्या इमारतीवर बसविलेले टॉवर अतिवृष्टी, वादळे आदी नैसर्गिक आपत्तीत पडू शकतात. चुकीची वीजजोड झाली असेल तर आग लागण्याची शक्यता असते. तसेच, मोबाईल टॉवरसाठी लावण्यात आलेल्या विद्युत जनित्रामुळे शहराच्या प्रदूषणामध्ये वाढ होत असल्यामुळे संबंधितांना नोटीस पाठविण्यात आली आहे.
देहू नगर पंचायत हद्दीत विनापरवाना घरच्या छतावर किंवा खासगी जागेत रहिवासी वस्तीमध्ये मोबाईल टॉवर उभे करण्यात आले आहेत. मोबाईल टॉवरबाबत स्ट्रक्चर परवानगी असल्यास परवानगीची सर्व कागदपत्रे तीन दिवसांच्या आत सादर करण्यास संबंधित मोबाईल टॉवर बसविलेल्या मालकांना नोटीसद्वारे कळविण्यात आले आहे. मोबाईल टॉवरकरिता देहू नगरपंचायतीची रितसर परवानगी घेण्याकरिता स्ट्रक्चर अभियंता यांचे स्थैर्य तपासणी, मालकी हक्काची कागदपत्रे मोबाईल, टॉवर नकाशे सादर करण्याचे आवाहन नगरपंचायतने केले आहे.
संबंधित मोबाईल टॉवर मालकांनी दिलेल्या मुदतीत कागदपत्रे सादर केली नाहीत, तर त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. मोबाईल टॉवरमुळे काही अपघात घडल्यास अथवा जीवितहानी झाल्यास त्यास मोबाईल टॉवर मालक जबाबदार राहणार आहेत.
– संघपाल गायकवाड, बांधकाम अभियंता, देहू नगरपंचायत