नाशिक : भाजप शहराध्यक्षपदाचा सस्पेन्स कायम | पुढारी

नाशिक : भाजप शहराध्यक्षपदाचा सस्पेन्स कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
‘पार्टी विथ द डिफरन्स’ असा नारा देणार्‍या भाजपच्या नाशिक शहराध्यक्षपदासाठी अनेकांची नावे समोर येत असून, शहराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे. गेल्या शनिवारी (दि.9) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नाशिक दौर्‍यावर होते, अशात शहराध्यक्षपदासाठी अनेकांनी जोरदार लॉबिंग केले होते. विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्षांनी शहराध्यक्षपदासाठीच्या काही नावांवर चर्चाही केली. मात्र, नाव गुलदस्त्यात ठेवल्याने, नाशिक भाजप शहराध्यक्षपदाचा सस्पेन्स कायम आहे.

‘एक व्यक्ती, एक पद’ या फॉर्म्युल्यानुसार शहराध्यक्षपदाची निवड केली जावी, अशी मागणी पक्षातील इच्छुकांकडून केली जात असून, प्रदेशाध्यक्षांपर्यंतदेखील हा संदेश पोहोचविण्यात आला आहे. त्यातच नव्या-जुन्यांचाही वाद उकरून काढण्यात आला असून, शहराध्यक्षपदासाठी नव्या चेहर्‍यांना संधी दिली जावी, असाही एक मतप्रवाह समोर येत आहे. मात्र, आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता पक्ष या सर्व बाबींचा विचार करणार काय? याबाबतही तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान, महापालिकेत विविध पदे उपभोगलेल्या पदाधिकार्‍यांचीच नावे शहराध्यक्षपदासाठी पक्षश्रेष्ठींकडे पोहोचविली जात असल्याने, इतर इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. शिवाय पक्षाने ‘एक व्यक्ती, एक पद’ या फॉर्म्युल्यानुसार आमचा विचार करावा, अशी जोरदार मागणीही त्यांच्याकडून केली जात आहे. सद्यस्थितीत अंतर्गत गटबाजी वाढल्याने नाशिकमधील पक्षाची स्थिती काहीशी डळमळीत होताना दिसत आहे. मधल्या काळात जबाबदार पदाधिकार्‍यांकडूनच पक्षविरोधी कामे केली गेली. मात्र, अशातही पक्षाने कारवाई न करता त्यांच्याकडे महत्त्वाची पदे दिलीत. त्यामुळे पक्षाचे जुने जाणते पदाधिकारी कमालीचे अस्वस्थ झाले होते. त्यातच घंटागाडी ठेक्याशी संबंधित वादग्रस्त ठेकेदारांकडेच महत्त्वाची पदे दिल्यानेही पक्षाची प्रतिमा मलीन झाली. या सर्व घटना घडूनदेखील महापालिकेत मोठमोठी पदे उपभोगणार्‍यांकडूनच शहराध्यक्षपदासाठी लॉबिंग केले जात असल्याने, पक्षाचे जुने पदाधिकारी कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. तसेच शहराध्यक्षपदाची माळ कोणत्याही स्थितीत पक्षविरोधी कामे करणार्‍यांच्या गळ्यात पडू नये, यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे भाजप शहराध्यक्षपदाचा मुद्दा सध्या चांगलाच तापला असून, शहराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे कार्यकर्त्यांच्या नजरा लागून आहेत.

हेही वाचा:

Back to top button