Satyajit Tambe : नियोजन अन् संपर्कातून विजयश्री | पुढारी

Satyajit Tambe : नियोजन अन् संपर्कातून विजयश्री

नाशिक : गौरव जोशी
अवघ्या राज्यात लक्षवेधी ठरलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघावर अपक्ष सत्यजित तांबे यांनी एकतर्फी विजय संपादित केला. आमदार सुधीर तांबे यांची पुण्याई, सुयोग्य नियोजन आणि जनसंपर्कच्या जोरावर तांबे यांनी विजयाला गवसणी घातली.

निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्याच्या पहिल्या दिवसापासून चर्चेत असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात गेल्या महिनाभरात अनेक चढ उतार पाहायला मिळाले. विद्यमान आमदार सुधीर तांबे यांनी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार असताना तसेच जवळ एबी फॉर्म असतानादेखील पुत्र सत्यजित यांच्यासाठी माघार घेतली. तेथेच निवडणूकीला खरी कलाटणी मिळाली.

तांबे पिता-पुत्र यांच्या बंडखोरीमुळे हकांची जागा गमावण्याची नामुष्की काँग्रेसला पत्करावी लागली खरी. मात्र यासर्वा मागे भाजपा पर्यायाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खेळी असल्याची चर्चाही यानिमित्ताने रंगली. तांबे यांच्या बंडखोरीमुळे हातची सीट गेल्याचे शल्य असलेल्या काँग्रेसने तसेच मविआतील अन्य पक्षांनी अखेर धुळ्याच्या अपक्ष शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. परंतु पाटिल यांना पाठिंबा देण्यावरुन मविआतील तिन्ही घटक पक्षात एकमत नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. पाटील यांना पाठिंबा देण्यावरून काँग्रेस व शिवसेना ठाकरे गट यांच्यात दोन गट पडले. तर राष्ट्रवादी पहिलेपासून काहीशी नामानिराळी राहिली

याच गोष्टीचा फायदा उचलत तांबेनी विजय खेचून आणला खरा. पण तरीही सत्यजित तांबे यांच्यासाठी ही लढाई सोपी ठरली नाही. बंडखोरीचे करण देत काँग्रेसने प्रथम आ. तांबे यांना आणि त्यांनरत सत्यजित यांना पक्षातून निलंबित केले. तर दुसरीकडे सत्त्यजित तांबे यांनी निवडणूकीत ज्यांचे जीवावर रणशिंग फुकले त्या भाजपाने अखेर पर्यंत पाठिंबाबद्लचे सस्पेन्स कायम ठेवले. यासर्व घडामोडीत शुभांगी पाटील यांनी पाचही जिल्ह्यात प्रचाराचा धडाका लावला. त्यामुळे काही काळ तांबे यांच्या गोटात चिंता निर्माण झाली होती. मात्र निवडणूकीच्या अखेरच्या टप्यात सत्यजित तांबे यांनी आक्रमक व्यूहरचना आखत बाजी मारली. यामध्ये आमदार सुधीर तांबे यांनी गेली 13 वर्षे मतदारसंघाची केलेली बांधणी, सत्यजित यांनी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद भूषविताना निर्माण केलेली युवकाची फळी आणि विविध संघटनांनी दिलेला पाठिंबा यामुळे तांबे यांचा विजय सोपा झाला.

आश्वासन पूर्ण करण्याचे आवाहन

सत्यजित तांबे यांनी निवडणूक लढविताना शिक्षक, युवक आणि बेरोजगार यांच्या समस्याना हात घातला होता. निवडून आल्यावर शिक्षकांचे वेतन, जुनी पेन्शन योजना, शासकीय भरतीचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्याचं जोरावर पदवीधर मतदारांनी त्यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना निवडून आणले. त्यामुळे आता सत्यजित तांबे यांच्या पुढे दिलेले आश्वासन पूर्ण करण्याचे आव्हान असणार आहे..

हेही वाचा :

Back to top button