भाजपने घेतला कोकणचा बालेकिल्ला पुन्हा ताब्यात | पुढारी

भाजपने घेतला कोकणचा बालेकिल्ला पुन्हा ताब्यात

कोकण वार्तापत्र : शशिकांत सावंत

कोकण शिक्षक मतदारसंघ हा भाजपचा वर्षानुवर्षांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा मतदारसंघ होता. मात्र, 2017 ला झालेल्या या विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिक्षक परिषद आणि शिवसेना-भाजपमध्ये त्या काळात झालेल्या बंडखोरीमुळे ही जागा शेकापच्या बाळाराम पाटील यांनी काबीज केली होती. शिक्षक नसलेले बाळाराम पाटील पहिल्यांदाच शिक्षक मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र, या पराभवाचा वचपा काढत भाजपने मोठ्या मताधिक्याने या निवडणुकीत मोठा विजय मिळविला. भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांना 20 हजार 748, तर महाविकास आघाडीच्या बाळाराम पाटील यांना 9 हजार 768 मते मिळाली आहेत.

कोकणातील या शिक्षक मतदारसंघाच्या निर्मितीनंतर भाजपचे वसंत बापट हे पहिल्यांदा सलग दोन निवडणुका जिंकत होते, तर संत एकवेळा आणि रामनाथ मोते दोनवेळा अशी तब्बल 30 वर्षे भाजपच्या अधिपत्याखाली असलेला हा मतदारसंघ होता. शिक्षक परिषद ही संघटना प्रभावीपणे या भागात काम करत होती. त्याचा फायदा भाजपला मिळत होता. सलग 5 वेळा भाजपने निवडणूक जिंकल्यामुळे हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र, कोकण शिक्षक मतदारसंघ प्रथमच शेतकरी कामगार पक्षाने 2017 ला काबीज केला आणि नवा इतिहास घडला होता. गेली सहा वर्षे शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यात पाटील कमी पडले, असा झालेला प्रचार भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रेंच्या पथ्यावर पडला. गेली 6 वर्षे ज्ञानेश्वर म्हात्रे या मतदारसंघात काम करत होते, याचाही फायदा त्यांना मिळाला. 2017 ला शिवसेनेचे उमेदवार म्हणून बाळाराम पाटीलयांच्या विरोधात त्यांनी दुसर्‍या क्रमांकाची मते मिळवली होती. 2017 च्या निवडणुकीत बाळाराम पाटील यांना 18 हजार, ज्ञानेश्वर म्हात्रे यांना 9 हजार, तर शिक्षक परिषदेचे बंडखोर उमेदवार रामनाथ मोते यांना 7 हजार, तर भाजपचे वेणुनाथ कडू यांना 3 हजार मते मिळाली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये शिक्षणमंत्री म्हणून विनोद तावडे कार्यरत होते. ते कोकण भागाचे भाजपचे प्रभारी होते. त्यांनी विद्यमान आमदार रामनाथ मोते यांचे तिकीट कापून कडूंना उमेदवारी दिली होती. यामुळे शिक्षक परिषदेमध्ये बंडखोरी झाली. त्यात आणि शिवसेनेकडून ज्ञानेश्वर म्हात्रे हेही रिंगणात उतरलेे होते.

साहजिकच युतीच्या तीन उमेदवारांमध्ये मतविभागणी झाल्याने बाळाराम पाटील विजयी झाले होते. यामुळे मोठ्या बंडाळीचा भाजपला सामना करावा लागला. त्याची परिणिती पराभवात झाली होती. भाजपने 2017 चा हा मागचा इतिहास लक्षात घेऊन मागच्या चुका सुधारत शिंदे गटात असलेल्या आणि मागच्यावेळी दुसर्‍या क्रमांकाची मते घेणार्‍या ज्ञानेश्वर म्हात्रे यांना आयत्यावेळी भाजपमध्ये आणून उमेदवारी दिली. त्यामुळे भाजप आणि शिवसेना यांची मते म्हात्रेंच्या पारड्यात पडली. आणि पुन्हा एकदा भाजपचा बालेकिल्ला त्यांच्या ताब्यात आला.

कोकणातील या विजयामुळे भाजप आणि शिंदे गटाचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे. म्हात्रे यांच्या विजयासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे, कपिल पाटील, राज्यमंत्रिमंडळातील कॅबिनेटमंत्री रवींद्र चव्हाण, दीपक केसरकर, उदय सामंत आणि त्यांचे 23 आमदार यांचे पाठबळ म्हात्रे यांच्या पाठीशी होते. याचा फायदा म्हात्रे यांना मिळाला. त्यामानाने बाळाराम पाटील यांच्या मागे शिवसेनेचे तीन आमदार आणि एक खासदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आमदार, एक खासदार आणि शेकाप नेते जयंत पाटील एवढी मर्यादित रसद होती. कोकणातील भाजपच्या या विजयामुळे भविष्यात कोकणात कोणाचे प्राबल्य राहणार, याची चर्चा सुरू झाली आहे.

Back to top button