नगर : सत्यजित तांबेंचा दणदणीत विजय; मविआच्या शुभांगी पाटील यांचा 29465 मतांनी पराभव | पुढारी

नगर : सत्यजित तांबेंचा दणदणीत विजय; मविआच्या शुभांगी पाटील यांचा 29465 मतांनी पराभव

नगर; पुढारी वृत्तसेवा : विधान परिषदेच्या बहुचर्चित नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजित सुधीर तांबे यांचा दणदणीत विजय झाला. शिवसेना पुरस्कृत मविआच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा 29 हजार 465 मतांनी पराभव करत सत्यजित यांची स्वप्नपूर्ती झाली. उमेदवारी करण्यापासून ते मतदानापर्यंत अनेकांनी नानाविध आरोप करत तांबे कुटुंबांना टार्गेट केले, पण कोणतेही प्रत्युत्तर न करता तांबे यांनी संयम पाळला. निकालाची घोेषणा होताच तांबे समर्थकांनी गुलालाची उधळण, फटाक्याची आतिषबाजी करत जल्लोष केला.

नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आ. डॉ. सुधीर तांबे यांची मुदत संपत असल्याने 30 जानेवारीला मतदान झाले. नगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदूरबार जिल्ह्यातील 2 लाख 62 हजार 678 मतदारांपैंकी 1 लाख 29 हजार 456 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. नाशिक येथे गुरूवारी 28 टेबलवर मतमोजणी सुरू झाली. सुरूवातीला बाद मतपत्रिका बाजुला काढून विजयाचा कोटा निश्चित करण्यात आला. त्यानंतर मतमोजणीला सुरूवात झाली.

पहिल्या फेरीतच सत्यजित तांबे यांनी शुभांगी पाटील यांच्यापेक्षा 7922 मते जास्तीची घेत आघाडी घेतली. दुसर्‍या फेरीत तांबे यांची आघाडी 14 हजार 693 तर तिसर्‍या फेरीत 20733 मतांवर पोेहचली. तांबे यांनी तिन्ही फेर्‍यात आघाडी घेताच तांबे समर्थकांनी जल्लोष सुरू केला. चौथ्या फेरीतही तांबे यांची आघाडी 26 हजारावर पोहचली. पाचव्या फेरीत 8 हजार 838 मते घेत सत्यजित तांबे यांनी शुभांगी पाटील यांचा. 29 हजार 465 मतांनी पराभव केाला. विजयासाठी 58 हजार 310 मतांचा कोटा तांबे यांनी चौथ्या फेरीनंतरच ओलांडला. या विजयाने सत्यजित तांबे यांचे आमदारकीची स्वप्न पुरे झाले.

सुशिक्षित पदवीधर मतदार असतानाही मते बाद होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसले. 12 हजार 297 मते बाद झाली. वंचितचे उमेदवार रतन बनसोडे यांना तीन नंबरची मते मिळाली. त्यांना एकूण 2 हजार 645 मते मिळाली. अविनाश महादू माळी यांना 1845 मते मिळाली. अन्य 12 उमेदवारांना मतांची हजारीही ओलांडता आली नाही.

भाजपचा सपोर्ट, पण अपक्षच राहणार
मतदारसंघात पक्षाचा उमेदवार नसल्याने भाजप सत्यजित तांबे यांना पुरस्कृत करतील अशी शक्यता सुरूवातीला वर्तविली गेली, मात्र तांबे यांनी भाजपकडे पाठिंबाच मागितला नाही. पिताश्री डॉ. सुधीर तांबे यांनी बांधणी केेलेल्या या मतदारसंघात सत्यजित तांबे हे अपक्ष उमेदवारी करत मतदारांसमोर गेले. अखेरच्या टप्प्यात भाजप कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिला.

स्थानिक, कर्तबार नेतृत्व म्हणून कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खा. डॉ. सुजय विखे यांनी सांगितले. तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने भाजप कार्यकर्त्यांनी तांबे यांना सपोर्ट केल्याचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचे म्हणणे आहे. भाजपचा आदेश काही असला तरी स्थानिक विखे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबे यांना सपोर्ट केला. मात्र तरीही सत्यजित तांबे हे अपक्ष उमेदवारीवर ठाम राहिले. इतकेच काय तर यापुढेही अपक्षच असेल असेही त्यांनी जाहीर केले.

पडलेली एकूण मते

तांबे – 68999
पाटील – 39534

उमेदवार          पहिली फेरी  दुसरी फेरी  तिसरी फेरी   चौथी फेरी   पाचवी फेरी   एकूण अवैध मते
सत्यजित तांबे   15784          15225       14651         14501        8838             12297
शुभांगी पाटील   7862           8454         8611            8849        5758

Back to top button