नाशिक : पदवीधरच्या निकालाआधीच सत्यजित तांबेंनी गमावला पाठीराखा, मानस पगार यांचे अपघाती निधन | पुढारी

नाशिक : पदवीधरच्या निकालाआधीच सत्यजित तांबेंनी गमावला पाठीराखा, मानस पगार यांचे अपघाती निधन

 पंचवटी (नाशिक) : पुढारी वृत्तसेवा 

पंचवटी डेपोसमोरील उड्डाण पुलावर बुधवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात नाशिक ग्रामीण युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानस पगार (32) यांचा मृत्यू झाला असून या अपघातामुळे एक उमदे युवा नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे. मानस पगार हे सत्यजीत तांबे यांचे निकटवर्तीय मानले जात होते. तसेच युवक काँग्रेसमधील चर्चेतील चेहरा म्हणून त्यांची ओळख होती.

सत्यजित तांबे यांनी स्वत: ट्विट करत आपल्या सहका-यास श्रद्धांजली व्यक्त केली आहे. माझा खंबीर पाठीराखा सहकारी मित्र, नाशिक जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष, मानस पगार याचे अपघाती निधन झाले. मन सुन्न करणारी ही बातमी आहे. निशब्द करणारी बातमी आहे. असे ट्विट करत सत्यजित तांबे यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

पंचवटी डेपोसमोरील उड्डाण पुलावर बुधवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मानस पगार हे सहकाऱ्यासमवेत पिंपळगावकडे परतत होते. मागून आलेल्या वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या मानस पगार यांचे निधन झाले. तर सहकारी सूरज मोरे हा गंभीर जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पगार हे सोशल मीडियावर काँग्रेसची भूमिका अत्यंत आक्रमकपणे मांडत असत. त्यामुळे पक्षाने त्यांच्या कामाची दखल घेत त्यांच्यावर युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. मानस पगार यांच्या अकाली मृत्यूचे वृत्त समजताच राज्य व देशपातळीवरील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सोशल मिडियावर श्रद्धांजली अर्पण केली आहे. अनेकांना या वृत्ताने धक्का बसला आहे.

…..त्या उपोषणामुळे आले होते चर्चेत

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या घराबाहेर मानस पगार यांनी दीर्घकाळ केलेल्या आंदोलनाची राज्यभर चर्चा झाली होती. दानवेंनी शेतकऱ्यांसाठी वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेमुळे त्यांच्या घरासमोर उपोषण करण्यात आले होते. त्यात मानस पगार आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या सुटकेसाठी युवक काँग्रेसने सोशल मीडियावर मोहीम सुरू केली होती.

हेही वाचा :

Back to top button