धर्मांतरणातून राष्ट्रांतरणाचा कुटील डाव रोखण्यासाठी कायद्याची गरज : योगी आदित्यनाथ | पुढारी

धर्मांतरणातून राष्ट्रांतरणाचा कुटील डाव रोखण्यासाठी कायद्याची गरज : योगी आदित्यनाथ

जळगाव : उत्तर प्रदेशात कुणी धर्मांतर करु शकत नाही, तेथे असे केल्यास १० वर्षांची शिक्षा आहे. आता तिथे दंगल होत नाही. तसेच गोहत्या केल्यास कठोर शासन केले जाते. आम्ही कुणासोबतही भेदभाव करत नाही. मात्र आमच्या आस्थेला ठेच पोहोचल्यास सहन केलं जाणार नाही. धर्मांतरणाच्या माध्यमातून राष्ट्रांतरणाचा हेतू दिसून येत आहे. त्यामुळे आपण वेळीच सावध होऊन धर्मांतरण रोखण्यासाठी कठोर कायद्याची आवश्यकता असल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.

जामनेर तालुक्यातील गोद्री येथे हिंदू गोर बंजारा लभाना नायकडा समाज कुंभाचा आज शेवटचा दिवस आहे. आज सोमवारी (ता. ३०) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कुंभात सहभाग घेतला. याप्रसंगी व्यासपीठावर रा.स्व. संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी, संत बाबू महाराज, स्वामी श्यामकुमार, स्वामी जनार्दन महाराज, गोपाल चैतन्य महाराज, रामसिंग महाराज, धर्म जागरण अ.भा. प्रमुख शरदराव ढोले, पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खा. रक्षा खडसे आदी मान्यवर उपस्थित होते.

हिंदु धर्मात जन्माला येणे गौरवास्पद…

सर्व भारतीयांना सनातन धर्मावर गौरव असला पाहिजे, भारतात जन्म घेणे दुर्लभ आहे, त्यातही मानव जन्म घेणे अतिशय दुर्लक्ष आहे. आमचे सौभाग्या आहे कि, विश्वमानवतेचा विचार देणाऱ्या भारतात आम्ही केवळ जन्मच घेतला नाही, तर जगातील सर्वात प्राचीन आणि मानव कल्याणाचा विचार करणाऱ्या हिंदु धर्मात जन्म घेतला ही गौरवास्पद बाब आहे. वसुधैव कुटूंबकमचा उद्घोष सनातन धर्मच करतो. सतानन धर्माची छेडछाड म्हणजे मानवतेशी छेडछाड आहे. आपला धर्म जसाही असो त्यात मरणही श्रेष्ठ आहे मात्र दुसऱ्याचा धर्म भयकारक असतो. जे लोक धर्मांतरणाद्वारे राष्ट्रांतरणाची कुटील हेतू ठेवता त्यांचा हेतू हाणून पाडा. सर्वांनी मिळून कार्य केल्यास जातीभेद, प्रांतभेद, भाषाभेद विसरुन सर्व भारत एक झाल्यास जगाची कोणतीही ताकद रोखू शकत नाही असेही योगी आदित्यनाथ म्हणाले.

भारत सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार…

धर्मांतरणाच्या माध्यमातून राष्ट्रांतरणाची मानसिकता कधीच यशस्वी होऊ शकत नाही. आता देशवासी जागे झाले आहेत. ज्या ब्रिटनने दीडशे वर्ष भारतावर राज्य केले त्याला पछाडून भारत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. लवकरच चौथ्या क्रमांवर स्थान प्राप्त करेल. १४० कोटींचा भारत जगातील सर्वोच्च स्थानी विराजमान होईल, यात शंका नाही. जी-२० देशांचे नेतृत्व भारत करत आहे, ही गौरवास्पद बाब असल्याचे योगी आदित्यनाथ म्हणाले.

वर्षभरात राममंदिराचे काम पुर्ण होणार…

अयोध्येत पाचशे वर्षांची प्रतिक्षा संपून भगवान श्रीरामाच्या मंदिराचे भव्य निर्माण होत आहे. पाचशे वर्षात अनेक संघर्ष झाले, अनेक हिंदूंना, संतांना बलिदान करावे लागले. मात्र, संघाच्या नेतृत्वात आणि संतांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पुढे गेले. आज देशहिताचा विचार करणारी सरकार आल्यानंतर देशात राममंदिराचे भव्य निर्माण होणार आहे. या वर्षाच्या शेवटी मंदिराचे काम पुर्ण होईल आणि पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच रामलला भव्य मंदिरात विराजमान होतील. काशीमध्ये काशीविश्वनाथ धाम आपल्य भव्यतेमुळे सर्वांना आकर्षित करत आहे. पाच फुटांच्या गल्यांचे रुपांतर ५० फूट रुंद कॉरिडॉरमध्ये झाल्याने १ लाख भाविक एकाच वेळी येऊ शकतात. त्याचप्रमाणे महाकालेश्वर, केदारनाथ मंदिरासह अनेक मंदिरांचे पुन:निर्माण होत असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button