बारामती : स्थानिक गुन्हे शाखा, वडगाव पोलिसांनी वाळू माफियांवर उगारला कारवाईचा बडगा | पुढारी

बारामती : स्थानिक गुन्हे शाखा, वडगाव पोलिसांनी वाळू माफियांवर उगारला कारवाईचा बडगा

बारामती : पुढारी वृत्तसेवा : पुणे ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा व  वडगाव निंबाळकर पोलिसांनी चांदगुडेवाडी (ता. बारामती) गावच्या हद्दीत धरणवस्ती येथे कऱ्हा नदीपात्रातून बेकायदा वाळू उपसा करणा-या वाळू माफियांवर कारवाई केली. या प्रकरणी पाचजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी  ४७ लाख ७० हजार रुपयांची जेसीबी, ट्रॅक्टर व वाळू जप्त केली.  मनोहर शामराव चांदगुडे (रा. धरणवस्ती, चांदगुडेवाडी, ता. बारामती), स्वप्निल ज्ञानेश्वर भोंडवे व विठ्ठल तानाजी जाधव (रा. आंबी खुर्द, ता. बारामती), अमोल शंकर सणस (रा. ऊरुळीकांचन, ता. हवेली) व महादेव बाळू ढोले (रा. मोरगाव, ता. बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

बारामती तालुक्यात कऱ्हा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात बेकायदा वाळूचा उपसा केला जात आहे. यासंबंधीची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यांनी वडगाव निंबाळकर पोलिसांच्या मदतीने पंचांना सोबत घेत छापा टाकला. यावेळी तेथे एक ट्रक आढळून आला. ट्रक चालकाला विचारणा केली असता त्याने ही वाळू तुषार दत्तात्रय चांदगुडे व त्यांच्या भागीदारांकडून आणल्याचे सांगितले. पोलिसांनी क-हा नदी पात्रात धाव घेतली असता तेथे दोन जेसीबी, दोन ट्रॅक्टर, ट्राॅल्यांमध्ये वाळू उत्खनन करून भरून चोरून नेली जात होती. पोलिसांची चाहूल लागताच जेसीबी चालक अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. तेथे सापडलेल्या व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.

या कारवाईत १० लाख व ८ लाख रुपयांचे दोन जेसीबी, ४ ट्रॅक्टर, ट्राॅल्या, ट्रक असा असा ४७ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.  ही कामगिरी पोलिस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर अधिक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सपोनि राहूल गावडे, सहाय्यक फौजदार कारंडे, रविराज कोकरे, सचिन घाडगे, विजय कांचन, अभिजित एकशिंगे, स्वप्निल अहिवळे, वडगावचे उपनिरीक्षक योगेश शेलार, पोपट नाळे, नवले, मारुती जैनक आदींनी केली.

Back to top button