Shubhangi Patil : २ तारखेला विजयाची रॅलीच मातोश्रीवर घेऊन जाईन | पुढारी

Shubhangi Patil : २ तारखेला विजयाची रॅलीच मातोश्रीवर घेऊन जाईन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

विधानसभेतील संख्याबळाबरोबरच विधान परिषदेतही संख्याबळ मिळविण्यासाठीच भाजपकडून साम, दाम, दंड, भेद वापरून फोडाफोडीचे राजकारण केले जात आहे, असा आरोप करत नाशिक पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार सत्यजित तांबे यांचे उदाहरण देत शिवसेनेचे नेते (ठाकरे गट) सुभाष देसाई यांनी भाजपसह शिंदे गटावर (बाळासाहेबांची शिवसेना) शरसंधान साधले.

पदवीधर मतदारसंघाच्या शिवसेना पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचा मेळावा गुरुवारी (दि. १९) नाशिकमध्ये झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर शिवसेनेचे सचिव विनायक राऊत, खासदार अरविंद सावंत तसेच आमदार ऋतुजा लटके, आमदार विलास पोतनीस, आमदार अमशा पाडवी, शिवसेनेचे उपनेते सुनील बागूल, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी गटनेते विलास शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, रवींद्र पगारे, अर्जुन टिळे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील, शहराध्यक्ष शरद आहेर, जयंत दिंडे आदींसह धुळे, नंदुरबार व नगरमधील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. देसाई म्हणाले की, विधान परिषदेत आपले संख्याबळ पूर्वीप्रमाणेच अधिक राहिल्यास भाजप शिंदे गटाला एकही विधेयक पारीत करता येणार नाही हे माहीत आहे. त्यामुळेच हे संख्याबळ कमी करण्याकरता भाजपकडून फोडाफोडीचे राजकारण केले जात आहे. सर्वच कंपन्या स्थानिक असताना त्यांच्याशी करार करण्यासाठी दावोसमध्ये जाण्याचे कारण काय, असा प्रश्न देसाई यांनी उपस्थित करत ही सर्व नौटंकी सुरू असल्याचा टोला लगावला.

खासदार अरविंद सावंत म्हणाले, भाजप घराघरात भांडण लावण्याचे काम करत आहे. नावात सत्यजित असले तरी त्यांना मविआ पराजित करणार. विधानसभेसाठी भाजपला महाराष्ट्रात पंतप्रधानांना २७ सभा घ्याव्या लागल्या आणि आता मुंबई मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबईत यावे लागले. यातच उद्धव ठाकरे यांचे यश आहे. मुंबईच्या स्वच्छतेचा ध्यास युवा नेते आदित्य ठाकरे यांनी घेतला आणि आता भाजप शिंदे गटाचे सरकार त्यावर मेकअप करत असल्याची टीका सावंत यांनी केली. देशातील न्यायव्यवस्था न्याय देण्यास विलंब करत असल्याची खंत व्यक्त करत देशाचे चारही स्तंभ दोलायमान झाले असून, मराठी माणसांवरच ईडीच्या धाडी का पडत आहेत इतरांवर का नाही, असा प्रश्न उपस्थित केला.

यावेळी आमदार लटके यांनी निवडणुकीत झालेले अन्याय कथन करत तुम्हालाही अशा प्रकारच्या अडचणींना सामाेरे जावे लागू शकते परंतु, मागे हटू नका, असा सल्ला शुभांगी पाटील यांना दिला. याप्रसंगी आमदार पोतनीस, कोंडाजी आव्हाड, डॉ. हेमलता पाटील, शरद पाटील यांची भाषणे झाली. मेळाव्यास माजी आमदार योगेश घोलप, माजी नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, भागवत आरोटे, दीपक दातीर, योगेश गाडेकर, शोभा मगर आदी उपस्थित होते.

पदाधिकाऱ्यांना चोरणारी टोळी

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून इतर पक्षांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना चोरणारी टोळी निर्माण झाल्याची टीका ठाकरे गटाचे सचिव विनायक राऊत यांनी केली. लाेकशाहीचा मुडदा भाजपकडून पाडला जात आहे. पक्षाशी बेईमानी करून इतर ठिकाणी जाणारे सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांची तुलनाच होऊ शकत नाही. त्यामुळे पाटील यांचा विजय निश्चित असल्याचा दावा राऊतांनी केला.

पंतप्रधानांच्या सभेला फेरीवाले

पीएम स्वनिधीच्या नावे कर्ज देण्याच्या बहाण्याने मुंबईतील फेरीवाल्यांसह इतरांना पंतप्रधानांच्या सभेला घेऊन गेल्याचा आरोपही विनायक राऊत यांनी केला. यावेळी राऊत यांनी शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांचा समाचार घेताना पाटील यांनी मविआच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर करावा अन्यथा त्यांचा बॅण्डबाजा वाजविल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच राऊत यांनी दिला.

‘मातोश्री’वर विजयाची रॅली : शुभांगी पाटील

मेळाव्यात उमेदवार शुभांगी पाटील यांनी मविआने आधार दिल्याने बळ मिळाल्याचे सांगत येत्या २ तारखेला विजयाची रॅलीच मातोश्रीवर घेऊन जाईन, असा विश्वास व्यक्त करत पदवीधरांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मागे हटणार नसल्याचे आश्वासन दिले.

हेही वाचा :

Back to top button