पुणे : पाणी, आरोग्य विषयांवर पुण्यात आजपासून परिषद | पुढारी

पुणे : पाणी, आरोग्य विषयांवर पुण्यात आजपासून परिषद

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ‘शाश्वत पाणीपुरवठा व सार्वजनिक आरोग्य-सर्वांसाठीची उपलब्धता’ या विषयावर देशभरातील तज्ज्ञांची तीन दिवसीय (20 ते 22 जानेवारी ) परिषद पुण्यात होत आहे. ही परिषद पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. या परिषदेत पर्यावरण अभ्यासक डॉ. राजेंद्र शेंडे व माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचे ‘वातावरणीय बदलांचे पाण्यावर होणारे परिणाम’ यावर व्याख्यानही होणार असल्याची माहिती इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशनचे (आयवा) राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद कुमार सिन्हा व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

‘आयवा’चे तीन दिवसीय 55 वे अधिवेशन 20 ते 22 जानेवारी रोजी पुण्यात होत आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 20) सकाळी 9.30 वाजता हडपसर येथील मेस्से ग्लोबल (लक्ष्मी लॉन्स) पुणे येथे होणार आहे, भुजबळ म्हणाले, उद्घाटनावेळी राज्याच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजीव जैस्वाल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव अभिषेक कृष्णा, जलजीवन मिशनचे संचालक ऋषिकेश यशोद आदी उपस्थित राहणार आहेत.

अधिवेशनाचा समारोप विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांच्या उपस्थितीत रविवारी (दि. 22) दुपारी 4 वाजता होणार आहे. पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्यासह इतर प्रशासकीय अधिकारी विविध चर्चासत्रांत सहभागी होणार आहेत. डॉ. दयानंद पानसे म्हणाले, ‘हर घर जल : आव्हाने व उपाय’, ‘चोवीस तास पाणीपुरवठा’, ‘सांडपाणी नियोजन’, ‘मलनिःस्सारण व्यवस्थापन’, ‘जल व मैलापाणी शुद्धीकरण’, ‘यंत्रणांचे संचलन व देखभाल’, ‘जलस्रोतांचे व्यवस्थापन” अशा विषयांवर विचारमंथन होईल.

यासह ‘जलजीवन अभियान’ व ‘अमृत’ ही विशेष सत्रे व युरोप, जपान आणि ब्रिटन येथील तज्ज्ञांचे ‘संशोधन व विकास तंत्रज्ञानाचे आदानप्रदान’वर आंतरराष्ट्रीय चर्चासत्र, तरुणाईसाठी पाणी क्षेत्राशी निगडित पोस्टर स्पर्धा, तज्ज्ञ व अनुभवी व्यक्तींचे शोधनिबंधांचे सादरीकरण होईल. अत्याधुनिक यंत्रे, उपकरणे व तांत्रिक माहिती असलेल्या 142 स्टॉल्सचे प्रदर्शन भरेल. भारतासह परदेशातून 1100 पेक्षा अधिक अभियंता प्रतिनिधी, तर 150 हून अधिक युवकांनी सहभागासाठी नोंदणी केली आहे. प्रशासनातील विविध अधिकारी, आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञ व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.

यंदाच्या अधिवेशनात पाणीपुरवठा क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल लखनौ येथील इंजि. अनिल कुमार गुप्ता यांना ‘जलनिर्मलता’, ‘सीओईपी’चे डॉ. पराग सदगीर यांना ‘जलसेवा’, तर लखनौ येथील पल्लवी राय यांना युवा महिला अभियंता म्हणून ‘ब्रिजनंदन शर्मा पुरस्कारा’ने सन्मानित केले जाणार आहे, असेही भुजबळ यांनी नमूद केले.

Back to top button