नाशिक : देवळालीत राजश्री अहिरराव भाजप - शिंदे गटाच्या उमेदवार ? | पुढारी

नाशिक : देवळालीत राजश्री अहिरराव भाजप - शिंदे गटाच्या उमेदवार ?

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

नाशिक तालुक्यात तहसीलदार म्हणून कार्यरत असताना ग्रामीण भागातील नागरिकांना सतत मदत व सहकार्य केल्याने राजश्री अहिरराव प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत. देवळाली विधानसभा मतदार संघातून अहिरराव २०२४ ची पंचवार्षिक निवडणूक लढविणार असल्याची चर्चा सद्या होत आहे. भारतीय जनता पार्टी किंवा बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) या पक्षाकडून त्या निवडणूक लढविणार असल्याचे बोलले जात आहे.

तालुक्याचे तहसिलदार म्हणून कार्यरत असताना राजश्री अहिरराव यांच्या कामकाजाची सर्वाधिक चर्चा झाली. विशेषता देवळाली विधानसभा मतदार संघातील नागरिकांना त्यांनी नवीन रेशनकार्ड काढून देण्यास मदत केली. रेशन कार्ड काढण्यापासून कोणीही नागरिक वंचित राहू नये, यासाठी ग्रामीण भागात ठीकठिकाणी शिबिरांचे आयोजन केले होते. जास्तीत जास्त नागरिकांनी त्यावेळी रेशन कार्ड मिळवून देण्यास सहकार्य केले. रेशनकार्ड सोबतच शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळावा, यासाठी त्यांनी प्रयत्न  केले. देवळाली विधानसभा मतदार संघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. राजश्री अहिरराव देखील याच प्रवर्गातील आहे. त्यामुळे त्यांचे नाव देवळाली विधानसभा मतदार संघात इच्छूक म्हणून कायम चर्चेत असते. यापूर्वी त्यांचे नाव राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाकडून चर्चेत होते. सद्याच्या राजकीय प्रवेशांच्या चर्चेच्या घडामोडी पाहता त्यांचे नाव देवळाली विधानसभा मतदार संघातून पुन्हा एकदा पुढे येत आहे. यावेळेला त्यांचे नाव भाजप – शिंदे गट यांच्याकडून घेतले जात आहे. त्यामुळे आता आमदार सरोज अहिरे, माजी आमदार योगेश घोलप व राजश्री अहिरराव अशी भाविष्यातील लढत अपेक्षित असल्याची चर्चा आहे.

मी सद्या शासकीय नोकरीत आहे. त्यामुळे सद्या निवडणूक लढविण्याचा माझा कोणताही निर्णय नाही. देवळाली विधानसभा मतदार संघातून समान्य जाणता माझ्या नावाची चर्चा करीत असेल तर त्याविषयी मला माहिती नाही. खरोखर चर्चा होतच असेल तर याविषयी मी जनतेचे आभार मानते. ते मला विधानसभा सदस्याच्या पात्रतेचे समजतात ,हेच माझ्यासाठी खूप मोठे वाटते. – राजश्री अहिरराव, तहसिलदार.

हेही वाचा:

Back to top button