मिळकत कराच्या वसुलीसाठी तळेगावात मोहीम | पुढारी

मिळकत कराच्या वसुलीसाठी तळेगावात मोहीम

तळेगाव दाभाडे : पुढारी वृत्तसेवा : मिळकत कराच्या वसुलीसाठी तळेगाव दाभाडे नगर परिषदेमार्फत धडक मोहीम सुरू असून, याअंतर्गत 31 डिसेंबर अखेरपर्यंत शहरातील 53 रहिवासी मालमत्ता व 20 बिगर रहिवासी मालमत्ता, अशा एकूण 73 थकबाकीदार यांच्या मालमत्ता अटकावून ठेवलेल्या आहेत.  अटकावून ठेवलेल्या किंवा जप्त केलेल्या मालमत्तेच्या मालकाने (भोगवटादाराने) 31 मार्च 2023 अखेर थकीत कराची रक्कम नगर परिषदेकडे जमा न केल्यास महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 152 ते 156 सदर मिळकतींचा योग्य कायदेशीर प्रक्रिया अवलंबून जाहीर लिलाव प्रस्तावित करण्याचे नगर परिषदेचे नियोजन असल्याची माहिती मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी दिली.

नगर परिषदेचे मालमत्ता कराचे मोठे थकबाकीदार यांना जप्ती वॅारंट बजावलेनंतरही कराची थकीत रक्कम न भरणार्‍या थकबाकीदारांच्या मिळकत सिल करणेची प्रक्रिया दि. 12 डिसेंबरपासून नगर परिषदेमार्फत सुरू करण्यात आलेली होती.
सन 2022-23 अखेरपर्यंत मिळकत कराचे 100%उद्दिष्ट गाठणेसाठी नगर परिषदेमार्फत विजय शहाणे व तुकाराम मोरमारे यांचे नियंत्रणाखाली 2 वसुलीपथक नियुक्त करणेत आलेले आहेत.

जप्ती वॅारंट बजावलेपासून या पथकामार्फत एक कोटी एक्याऐंशी लाख रुपये रक्कम थकीत मिळकत करापोटी वसूल करण्यात आलेले आहेत. आता रक्कम रुपये 10,000 रुपयांपेक्षा अधिक थकीत मिळकत कर असलेल्या थकबाकीदारांना नगर परिषद जप्ती वॅारंट बजावून पुढील कार्यवाही सुरू करणार असलेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी सांगितले. तरी जप्तीची व मिळकतकर सील करणेची कटू कारवाई टाळणेसाठी मिळकतधारकांनी आपले कराची रक्कम त्वरित नगर परिषदेमध्ये जमा करावी, असे अवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

थकबाकी असलेल्या जप्ती वॉरंट

मागील महिन्यामध्ये नगरपरिषदेने ज्या मिळकतींची रक्कम 50000 रुपयांपेक्षा जास्त मिळकतकराची थकबाकी आहे, अश्या एकूण 593 मिळकतींना जप्ती वॅारंट बजावलेले आहेत.

Back to top button