जनतेच्या प्रश्नांकडे गत मुख्यमंत्र्यांकडून दुर्लक्ष; सामंतांची उद्धव ठाकरेंवर टीका

उद्धव ठाकरे, उद्य सामंत,www.pudhari.news
उद्धव ठाकरे, उद्य सामंत,www.pudhari.news

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

बाळासाहेबांची शिकवण वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण असतानादेखील विरोधक केवळ शंभर टक्के राजकारण करत असून, जनतेच्या प्रश्नाकडे मागील सरकारने दुर्लक्ष केले आणि मुख्यमंत्री कधी घराबाहेर पडले नाही. मात्र, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जनतेच्या सेवेसाठी आणि राज्याच्या विकासासाठी अहोरात्र दौरे करून शंभर टक्के समाजकारण करत असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला.

शिंदे गावात शासन आपल्या दारी या नाशिक तहसील कार्यालय उपक्रमांतर्गत नागरिकांना शिधापत्रिका, जातीचा दाखला, नॉन क्रिमिलेअर, शेतकरी उपयोगी विविध योजनांच्या माहितीसाठी रविवारी सकाळी ९ ते ५ या दरम्यान मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, प्रांत जितीन रहेमान, तहसीलदार अनिल दौंडे, गटविकास अधिकारी डॉ. सारिका बारीक, जिल्हाप्रमुख (शिंदे गटाचे) अनिल ढिकले उपस्थित होते.

सामंत पुढे म्हणाले की, जे आमदारांच्या मतदानावर निवडून येतात, त्यांना जनतेचे दु:ख आणि समस्या काय समजेल? खासदार गोडसेंनी लोकसभा मतदारसंघात राबविलेला शासन आपल्या दारी उपक्रम हा अतिशय स्तुत्य असून, मीदेखील तो रत्नागिरीत राबविणार असल्याचे सांगितले. ना. दादा भुसे म्हणाले की, आमचे नेते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सतत महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि तरुणांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्नशील असून, बाळासाहेबांचा विचार पुढे नेणार असल्याचे सांगितले. खासदार हेमंत गोडसे यांनी संजय राऊत यांना पोपटपंची म्हणत जे जनतेतून निवडून येत नाही ते नेहमी झोपेतून उठल्यानंतर घरासमोर मीडियाची वाट बघतात. रस्त्यावर बसणाऱ्या ज्योतिषाकडे जसा पोपट असतो आणि तो एक चिठ्ठी काढतो, तसेच राऊतांचे असल्याची टीका गोडसे यांनी केली. यावेळी सरपंच गोरख जाधव, सरपंच प्रिया गायधनी, सरपंच मंगला जगळे यांच्यासह आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news