डी. फार्मसी प्रवेशाची गुणवत्ता यादी आज; विद्यार्थ्यांना 10 ते 12 डिसेंबरदरम्यान प्रवेश घेता येणार | पुढारी

डी. फार्मसी प्रवेशाची गुणवत्ता यादी आज; विद्यार्थ्यांना 10 ते 12 डिसेंबरदरम्यान प्रवेश घेता येणार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या जाचक अटींमुळे साडेपाच ते सहा महिन्यांपासून खोळंबलेल्या डी. फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. डी. फार्मसी प्रवेशासाठीची अंतिम गुणवत्ता यादी सोमवारी (दि. 5) जाहीर करण्यात येणार आहे. तर, विद्यार्थ्यांना 10 ते 12 डिसेंबरदरम्यान प्रवेश घेता येणार असल्याचे तंत्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार स्पष्ट होत आहे.

2022-2023 या शैक्षणिक वर्षाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया ऑगस्टमध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने मान्यतेपूर्वी सर्व सुविधा, क्षमतेच्या अटींची फेरपडताळणी करण्यास सांगितले होते. जिथे प्रवेशक्षमता 100 आहे ती घटवून 50 केली होती. मात्र, आता ती पूर्ववत केली आहे. सध्या फक्त डी. फार्मसीचेच वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. प्रवेश फेर्‍या डिसेंबरमध्ये होतील. नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात जानेवारी 2023 मध्ये होणार आहे. कौन्सिलने प्रवेश प्रक्रिया राबविण्यापूर्वी महाविद्यालयांना मान्यतेसाठी घटविलेली संख्या यंदा पुन्हा ‘जैसे थे’ ठेवल्याची माहिती देण्यात आली आहे.

असे आहे नवे वेळापत्रक….

प्रवेशाची पहिली फेरी
30 नोव्हेंबर – नोंदणीची सुधारित मुदत
1 डिसेंबर – तात्पुरती यादी जाहीर
2 ते 4 डिसें. – हरकत, तक्रारींची मुदत
5 डिसेंबर – अंतिम गुणवत्ता यादी
6 ते 8 डिसेंबर – पहिला कॅपराउंड नोंदणी
9 डिसेंबर – कॅपराउंड निवड यादी जाहीर
10 ते 12 डिसेंबर – प्रवेशासाठी मुदत

प्रवेशाची दुसरी फेरी…
13 डिसेंबर – दुसर्‍या फेरीची यादी प्रसिद्ध
14 व 15 डिसेंबर – दुसर्‍या फेरीसाठी नोंदणी
16 डिसेंबर – दुसर्‍या फेरीसाठी निवड यादी
17 ते 19 डिसेंबर – प्रवेश घेण्यासाठी मुदत

Back to top button