Gujarat Election Phase २ : गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात

Gujarat Election Phase २ : गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरातमधील 14 जिल्ह्यांतील 93 जागांसाठी आज दुसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. सकाळी ८ वाजता मतदानाला सुरूवाद झाली आहे. बनासकांठा, पाटण, मेहसाणा, साबरकांठा, अरावली, गांधीनगर, अहमदाबाद, आनंद, खेडा, महिसागर, पंचमहाल, दाहोद, वडोदरा आणि छोटा उदयपूर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबाद येथील निशान पब्लिक स्कूलमध्ये ९ वाजता मतदान करणार आहेत.

भाजप आणि आप सर्व 93 जागांवर निवडणूक लढत आहेत. तर काँग्रेस 90 जागांवर निवडणूक लढवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दोन जागांवर उमेदवार उभे केले आहेत. इतर पक्षांमध्ये भारतीय ट्राइबल पक्षाने (BTP) 12 उमेदवार उभे केले असून बहुजन समाज पक्षाने (BSP) 44 उमेदवार उभे केले आहेत. २०१७ विधानसभा निवडणुकीत भाजपला ९३ पैकी ५१ जागांवर यश मिळाले होते. काँग्रेसला मात्र ३९ जागांवर समाधान मानावे लागले होते.

भाजप, काँग्रेससाठी प्रतिष्ठेच्या लढती

राजकोट पश्चिम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीची सुरुवात राजकोटमधून झाली होती. त्यामुळे राजकोट पश्चिम विधानसभा मतदारसंघातील निवडणूक (Gujarat Assembly Election) भाजपसाठी प्रतिष्ठेची ठरली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते वजुभाई वाला यांनी नरेंद्र मोदी यांच्यासाठी 2002 मध्ये या मतदारसंघाच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. तत्पूर्वी वाला यांनी येथून तब्बल सातवेळा विजय मिळवला होता. राजकोट पश्चिम मतदारसंघावर 1985 पासून भाजपचे वर्चस्व आहे. या वर्चस्वाला यावेळी काँग्रेस, आम आदमी पक्ष तडा देणार काय, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. भाजपने डॉ. दर्शिता शहा यांना तिकीट दिले असून काँग्रेसने मनसुखभाई कलारिया यांना संधी दिली आहे. तिकडे 'आप'ने दिनेश जोशी यांना मैदानात उतरविले आहे. 2017 च्या निवडणुकीत येथे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी काँग्रेसच्या इंद्रनील राजगुरू यांचा पराभव केला होता. रुपाणी यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याने डॉ. दर्शिता यांना उमेदवारीची लॉटरी लागली होती. त्यांच्या कामगिरीकडे आता सर्वांचे लक्ष आहे.

डेसा : 2017 च्या विधानसभा निवडणुकीवेळी बनासकांठा जिल्ह्यातील डेसा मतदारसंघात भाजपच्या शशिकांत पंड्या यांनी काँग्रेसच्या गोविंदभाई हमीराभाई यांना 14 हजार 531 मतांनी पराभूत केले होते. यावेळी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार बदलले आहेत. भाजपकडून प्रवीण माळी, तर काँग्रेसकडून संजयभाई राबरी मैदानात आहेत. आम आदमी पक्षाने रमेश पटेल यांना संधी दिली आहे.

उना : जुनागड लोकसभा मतदारसंघात येणार्‍या उना विधानसभा मतदारसंघात गतवेळी काँग्रेसच्या वंश पुंजाभाई यांनी भाजपच्या हरिभाई सोलंकी यांचा 4 हजार 928 मतांनी पराभव केला होता. यावेळी काँग्रेसने पुंजाभाई यांना पुन्हा संधी दिली आहे. दुसरीकडे भाजपने के. सी. राठोड यांना, तर आम आदमी पक्षाने सेजलबेन खुंट यांना तिकीट दिले आहे.

सोमनाथ : गत निवडणुकीत सोमनाथ मतदारसंघात काँग्रेसच्या विमल चुडासमा यांनी भाजपच्या जशाभाई बराड यांचा 20 हजार 450 मतांनी पराभव केला होता. यावेळी काँग्रेसकडून विमल चुडासमा हेच मैदानात आहेत. भाजपकडून मानसिंग परमार, तर आम आदमी पक्षाकडून जगमल वाला हे मैदानात आहेत. मागील काही दशकांपासून सोमनाथ मतदारसंघावर काँग्रेसचा दबदबा आहे. यावेळी काँग्रेसचा विजय झाला, तर ती हॅटट्रिक ठरेल. (Gujarat Assembly Election)

दानिलिंबडा : दलित आणि मुस्लिम लोकसंख्येचे प्राबल्य असलेल्या दानिलिंबडा मतदारसंघात भाजपला आजवर विजय प्राप्त करता आलेला नाही. अहमदाबाद जिल्ह्यातील या मतदारसंघात यावेळी आम आदमी पार्टी आणि एमआयएमने शड्डू ठोकलेला असल्याने मतांचे विभाजन होऊन आपणास फायदा होईल, असा भाजपचा होरा आहे. काँग्रेसचे नेते आणि विद्यमान आमदार शैलेश परमार हे 2012 पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. गतवेळी त्यांना 50 टक्क्यांपेक्षा जास्त मते पडली होती. अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या दानिलिंबडात आज सोमवारी मतदान होत आहे. दानिलिंबडामधील मुस्लिम लोकसंख्या 34 टक्के आहे, तर दलित लोकसंख्या 33 टक्के इतकी आहे. उर्वरित प्रबळ समाजवर्गात पटेल आणि क्षत्रिय यांचा समावेश आहे. यावेळी दलित समाजाची काही मते 'आप'कडे, तर मुस्लिम समाजाची काही मते एमआयएमकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपकडून या मतदारसंघात नरेशभाई व्यास मैदानात आहेत. एमआयएमकडून कौशिकीबेन परमार निवडणूक लढवित आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news