नाशिक : जिल्ह्यात तीन हजार कोटींचा उडणार बार

नाशिक : जिल्ह्यात तीन हजार कोटींचा उडणार बार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोरोना निर्बंधांमुळे अत्यंत साध्या पद्धतीने लग्नसोहळे उरकून घ्यावे लागले; आता सर्व निर्बंध हटविले असून, लग्नसोहळ्यात हौसमौज करण्याची कुठलीच कसर यजमानांकडून ठेवली जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पुढील आठ महिन्यांत जिल्ह्यात तब्बल तीन हजार कोटींचा बार उडवून दिला जाण्याची शक्यता आहे. सोमवारपासून जिल्ह्यात विवाहसोहळे रंगणार असून, नोव्हेंबर ते जूनदरम्यान तब्बल 58 मुहूर्त आहेत. या मुहूर्तांवर जिल्ह्यात पाच हजारांपेक्षा अधिक लग्नसोहळे पार पडणार आहेत.

25 नोव्हेंबर ते 28 जून 2023 पर्यंत लग्नाचे मुहूर्त आहेत. असे असले तरी तुळशीविवाह पार पडल्यानंतर म्हणजेच गेल्या 4 नोव्हेंबरपासूनच लग्नकार्याला सुरुवात झाली आहे. मात्र, खरा सीजन हा 25 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून, लॉन्स, इव्हेंट कंपन्या, कॅटरर्स, सभागृह, डीजे, बँड, घोडा यांच्यासोबतच पंडितांच्या व्यवसायालाही बूस्ट मिळणार आहे. प्रत्येक लग्नाचा वधू-वरांवरील खर्च हा 20 टक्के, तर विवाहसोहळ्यात काम करणार्‍यांवर 80 टक्के खर्च करावा लागतो. त्यामुळे या हंगामात कमाई करण्यासाठी जिल्ह्याबाहेरील इव्हेंट कंपन्या, डीजे, केटरर्स सक्रिय झाले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, लग्नसराईमुळे दसरा-दिवाळीपासून बाजारात सुरू झालेला खरेदीचा महोत्सव अजूनही कायम आहे. विशेषत: सराफ बाजार आणि कपडा बाजारात सध्या मोठी धूम असून, यजमानांकडून खरेदीचा आनंद घेतला जात आहे. त्यामुळे व्यावसायिकही समाधानी असल्याचे चित्र दिसून येत आहे.

फूलविक्रेत्यांपासून प्रवासी सेवाही जोरात
अनेक हातांना काम देणारा सोहळा म्हणून लग्नसमारंभाकडे बघितले जाते. कारण बॅण्ड, केटरर्स, लॉन्स यांच्यासह तंबू सजावट, फ्लॉवर डेकोरेशन, क्रॉकरी, खानपान सेवा, प्रवासी सेवा, कॅबसेवा, फूलविक्रेता, पत्रिका व्यावसायिक, डीटीपी ऑपरेटर, घोडा, बग्गी, पानवाला, अख्तरवाला अशा सर्वच घटकांच्या हातांना काम मिळत आहे. कोरोना काळात या व्यावसायिकांचे मोठे हाल झाले होते. मात्र, आता या व्यावसायिकांच्या हाताला काम आहे.

लग्नसराई सुरू झाल्याने कापड बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. बस्ता ही पद्धत आता बंद झाली आहे. त्यामुळे वधू आणि वराकडील मंडळी स्वतंत्रपणे कपडे खरेदी करतात. सध्या खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. जानेवारीपासून त्यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. – बालकिसन धूत, नाशिक होलसेल क्लॉथ अ‍ॅण्ड मर्चण्ट असोसिएशन.

सुपारी महागली..
महागाईमुळे यजमानांच्या खिशाला झळ सोसावी लागत आहे. व्यावसायिकांनी आपल्या दरांमध्ये 20 टक्क्यांची वाढ केली आहे. मंगल कार्यालये आणि बॅण्डपथकांनीदेखील त्यांच्या सुपारीत 20 ते 30 टक्क्यांची वाढ केली आहे. किराणा मालाच्या किमतीतही मोठी वाढ झाल्याने पंगतीचा खर्चही वाढला आहे.

कोरोनामुळे लॉन्सचालकांना मोठा फटका बसला आहे. अनेक जण कर्जबाजारी झाले आहेत. अशात पुन्हा एकदा लग्नसराईची धूम सुरू झाल्याने, लॉन्सचालकांना मोठा दिलासा मिळत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे लॉन्सचे दर स्थिर असून, काहींकडून कमी दरातही ऑडर्स स्वीकारल्या जात आहेत. – संदीप काकड, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मंगल कार्यालय संघटना.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news