शिक्षक बँक कर्ज व्याजदरात कपात ; बापूसाहेब तांबे यांचा संचालक मंडळाला आमसभेत आदेश | पुढारी

शिक्षक बँक कर्ज व्याजदरात कपात ; बापूसाहेब तांबे यांचा संचालक मंडळाला आमसभेत आदेश

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या सर्व प्रकारच्या कर्ज व्याजदरात 0.20% दराने कपात करण्याचा आदेश सत्ताधारी गुरुमाऊली मंडळाचे शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांनी संचालक मंडळाला दिला आहे.  जिल्ह्यातील सर्वसामान्य शिक्षकांची आमसभा आयोजित करण्यात आली होती. या आमसभेत रविकिरण साळवे, पांडुरंग मोहोळकर, योगेश खेडकर, ज्ञानेश्वर गर्जे, विजय नरवडे, राहुल खराडे, संजय पवार, हिरामण गुंड, शरद वांडेकर, कैलास सहाने, सतीश जाधव, ना.चि.शिंदे यासह अनेक कार्यकर्त्यांनी 0.20% व्याजदर कपातीच्या आश्वासनाची अंमलबजावणी करावी, अशी आग्रही मागणी केली.

यावर बापूसाहेब तांबे यांनी गुरुमाऊली मंडळ जो शब्द देते, तो तंतोतंत पाळते. आम्ही जे बोलतो, ते करून दाखवतो, असे म्हणत कर्जाचा व्याजदर यापुढे साडेआठ टक्के व शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह बांधणी कर्ज या कर्जाचा व्याजदर आठ टक्के करावा, असे संचालक मंडळाला आदेशित केले.

या सभेच्या अध्यक्षस्थानी गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार साळवे, महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष विद्या आढाव, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन गोकुळ कळमकर, साहेबराव अनाप, उच्च अधिकार समितीचे अध्यक्ष विठ्ठलराव फुंदे, बाबासाहेब खरात, सुयोग पवार, मच्छिंद्र लोखंडे, शिक्षक बँकेचे चेअरमन डॉ. संदीप मोटे, व्हा. चेअरमन कैलास सारोक्ते, सर्व तालुकाध्यक्ष, संचालक मंडळ व सभासद उपस्थित होते.

सभासद अहिताचा निर्णय नाही : साळवे

अध्यक्षपदाहून बोलताना राजकुमार साळवे म्हणाले की, कर्जाचा व्याजदर सत्ताधारी मंडळ वाढविणार, असा डांगोरा विरोधकांनी व्हॉटस् अ‍ॅपच्या माध्यमातून पेटविला होता. परंतु, असा सभासद अहिताचा निर्णय कधी घेणार नाही. तसेच, पुढेही असेच सभासदांच्या हिताचे निर्णय होतील असा आशावाद व्यक्त केला.

आश्वासनांची पूर्तता करणार

सभेत तांबे म्हणाले की, सर्वसामान्य सभासदांनी ठेवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही, असाच कारभार करणार आहे. भविष्यकाळात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली जाईल, असे आश्वासित केले.

Back to top button