SIP Investment : ‘आठ डॉलर’ ट्विटरपेक्षा गुंतवा ‘एसआयपी’त! | पुढारी

SIP Investment : ‘आठ डॉलर’ ट्विटरपेक्षा गुंतवा 'एसआयपी'त!

आपण ट्विटरचा वापर करत असाल, तर आता दरमहा आठ डॉलर शुल्क भरावे लागणार, अशी चर्चा आहे. भारतीय चलनात ही रक्कम सुमारे 650 रुपये इतकी आहे. ट्विटरचा वापर बंद केल्यास आणि ही रक्कम अन्यत्र गुंतवल्यास बराच आर्थिक लाभ होऊ शकतो. ( SIP Investment ) आपल्या मुलाचे किंवा मुलीचे वय 10 वर्षे आहे, तर पुढील 50 वर्षे म्हणजे निवृत्तीजवळ पोहचताना 650 रुपयांची मासिक गुंतवणूक ही मोठी रक्कम होईल. एवढेच नाही, तर आपला मुलगा कोट्यधीश होईल.

सध्याच्या काळात लहान मुले सोशल मीडियाकडे आकर्षित होत आहेत. युट्यूब, फेसबुक, लिंक्डेन, इन्स्टाग्राम आणि ट्विटरसारख्या प्लॅटफॉर्मवर मोठ्या संख्येने असलेले यूजर अल्पवयीन आहेत. यातील मोठी संख्या दहा ते बारा वयोगटातील मुलामुलींची आहे. दहा वर्षांपासूनच मुले ट्विटर किंवा अन्य सोशल मीडियावर सक्रिय राहत असतील, तर त्यांचे भवितव्य अंधारात राहू शकते.

अब्जाधीश उद्योगपती अ‍ॅलन मस्क यांनी ट्विवटरचा ताबा घेतल्यानंतर या सोशल मीडियाचा वापर करण्यार्‍यांंना आठ डॉलर दरमहा शुल्क मोजावे लागणार, असे जाहीर केले. साहजिकच, आपला मुलगा ट्विटर वापरत असेल, तर त्याचे शुल्क हे पालकांनाच भरावे लागेल. हे पैसे वाचविण्यासाठी पाल्यांना किमान ट्विटर वापरण्यास मज्जाव करावा लागेल. कारण ट्विटर दरमहा 650 रुपये खर्च आकारणार आहे. हे पैसे ट्विटरऐवजी एखाद्या म्युच्युअल फंड योजनेत मुलाच्या नावावर गुंतवले, तर त्याच्या निवृत्तीच्या काळात मोठी रक्कम उभी राहू शकते. एवढेच नाही, पुढील 50 वर्षांतच आपला मुलगा/ मुलगी कोट्यधीश होऊ शकते.

SIP Investment गणित काय?

उदा. मुलगा दहा वर्षांचा असेल, तर त्याचा सोशल मीडियाकडे ओढा असणे साहजिकच आहे. मुलगा दहा वर्षांपासूनच ट्विटरचा वापर करत असेल, तर तो पुढील 50 वर्षांत म्हणजे वयाच्या 60 व्या वर्षांपर्यंत ट्विटरच्या ‘ब्लू टिक’साठी 3.9 लाख रुपये मोजेल. त्याची गणना वायफळ खर्चात म्हणून केली जाईल. हा खर्च जर होणारच असेल आणि अशा वेळी मुलाला ट्विरपासून दूर ठेवण्यास आपण यशस्वी झालात, तर दरमहा 650 रुपये एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये ‘एसआयपी’च्या माध्यमातून गुंतवल्यास पुढील 50 वर्षांत ही रक्कम आपल्याला कोट्यधीश करू शकते.

कसे होईल शक्य? 

उदा. मुलाचे किंवा मुलीचे वय 10 असेल आणि त्याला ट्विटरपासून दूर नेण्यात यशस्वी ठरलात तर आठ डॉलर म्हणजे 650 रुपये मासिक रक्कम एसआयपीतून जमा करू लागलात, तर पुढील 50 वर्षांनंतर निवृत्तीजवळ पोहोचताच त्याला सुमारे 2.54 कोटी रुपये मिळतील. या कालावधीत आपण केवळ 3.9 लाख रुपयांची गुंतवणूक केलेली असेल. मूळ रकमेच्या तुलनेत मिळणारा परतावा हा अधिक आहे. हे सर्व कम्पाऊडिंगची कमाल असून, त्यात पैसा वेगाने वाढतो. अर्थात, त्याची गणना 12 टक्के दराने केली आहे. ही गणना 40 वर्षांसाठी केली, तर एकूण रक्कम 76.47 लाख रुपये होईल. 30 वर्षांत ही रक्कम 22.72 लाख रुपये होईल.

लहान मुलांनादेखील समजेल बचतीचे महत्त्व

लहानसहान वाटणारी रक्कम ही दीर्घकाळात मोठी रक्कम होते. त्यामुळे लहानसहान बचतीला कधीही किरकोळ समजू नये आणि एखाद्या गुंतवणूक योजनेत निश्चितपणे गुंतवणूक करावी. म्युच्युअल फंडच नाही; तर पीपीएफ, एलआयसीची लहान मुलांसाठी योजना, आवर्ती ठेव योजना, सुकन्या योजना आदींच्या माध्यमातून बचत करता येऊ शकते. त्याचवेळी लहान मुलांनादेखील बचतीचे महत्त्व लवकर समजू शकेल आणि ही सवय त्यांना नोकरीच्या काळातही उपयुक्त ठरू शकेल.

एकरकमी गुंतवणुकीचा पर्याय

आपण दरमहा आठ डॉलर म्हणजे 650 रुपयांच्या गुंतवणुकीची योजना आखत असाल, तर यात आणखी एक पर्याय आहे. आपण सलग 30 वर्षे गुंतवणूक करत असाल आणि त्यानंतर गुंतवणूक थांबवायची असेल, तर ती थांबवता येऊ शकते. तीस वर्षांपर्यंत जमा केलेली रक्कम विड्रॉल करून नंतर ती रक्कम दहा वर्षे किंवा वीस वर्षांसाठी एकरकमी गुंतवणूक करा. अर्थात यात मिळणारा परतावा हा कमी राहू शकतो.

विधिषा देशपांडे

 

हेही वाचा : 

Back to top button