आजपासून 37 ग्रामपंचायतींचा धुरळा ; नामनिर्देशन पत्र सादर करण्यास प्रारंभ | पुढारी

आजपासून 37 ग्रामपंचायतींचा धुरळा ; नामनिर्देशन पत्र सादर करण्यास प्रारंभ

संगमनेर / संगमनेर शहर: पुढारी वृत्तसेवा :  संगमनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणार्‍या 37 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी आज सोमवार (दि. 28) पासून सुरू होत आहे. ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपद सर्वसाधारण तसेच अनुसूचित जाती जमाती या गटासाठी राखीव आहे तर उर्वरित सुमारे 28 ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी राखीव आहे. त्यामुळे खर्‍या अर्थाने या 28 ग्रामपंचायतींवर ‘महिलाराज’ येणार आहे. त्यामुळे आपलीच पत्नी ग्रामपंचायतीत सरपंच झाली पाहिजे, यासाठी पतीराज पुढे सरसावले आहेत. महाविकास आघाडीचे सरकार जाऊन राज्यात शिंदे- फडणवीस सरकार आले आहे.

या सरकारने पुन्हा एकदा जनतेतून सरपंचपद निवडले जाईल, असे जाहीर केले आहे. यानंतर संगमनेर तालुक्यातील पहिल्याच टप्प्यात 37 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. यामध्ये बहुतांश ग्रामपंचायतीचे सरपंचपद महिलांसाठी राखीव झाले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर आपलीच पत्नी कशी विराजमान होईल, यासाठी आता सत्ताधार्‍यांसह विरोधकांनी चांगलीच कंबर कसली आहे. प्रत्येक ग्रामपंचायती साठी सत्ताधार्‍यांना शह देण्यासाठी तोडीस- तोड उमेदवार देण्यासाठी विरोधकसुद्धा सरसावले आहेत.

संगमनेर विधानसभा मतदार संघात घुलेवाडी, तळेगाव, निमोण, साकूर, धांदरफळ बु., पिंपरणे, अंभोरे, खराडी, वाघापूर, चिंचोली गुरव, जांभुळवाडी, रणखांबवाडी, दरेवाडी, जांबुत बु., कर्जुले पठार, डोळासणे, वडझरी खुर्द, करुले, निळवंडे, कोळवाडे, मालुंजे, पोखरी हवेली, निमगाव, भोजापूर, धांदरफळ खुर्द, चिकणी, सायखिंडी तर शिर्डी मतदार संघातील कोल्हेवाडी, जोर्वे, निमगाव जाळी, निंबाळे, हंगेवाडी, कनकापूर, सादतपूर, रहिमपूर, उंबरी बाळापूर, ओझर खुर्द अशा 37 ग्रामपंचायतींच्या निवडणुका 18 डिसेंबर रोजी होत आहेत.

संगमनेर विधानसभा मतदार संघात सुमारे 28 ग्रामपंचायतींवर काँग्रे सचे विधिमंडळ पक्ष नेते आ. बाळासाहेब थोरात यांचे एकहाती वर्चस्व आहे. शिर्डी मतदारसंघातील राहिलेल्या 9 ग्रामपंचायतींपैकी काही ग्रामपंचायतीवर भाजपचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्या गटाचे तर काही ग्रामपंचायतींवरती आ. बाळासाहेब थोरात गटाचे वर्चस्व आहे, मात्र सध्या आ. थोरात व ना. विखे पा. या दोघा नेत्यांमध्ये वाक्युद्ध सुरू आहे. ना. विखे पा. यांनी संगमनेर तालुक्यात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. ज्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत तेथे भाजपचा स्वतंत्र गट तयार केला आहे. कार्यकर्त्यांची फळीसुद्धा भाजपच्या माध्यमातून प्रत्येक गावात उभी केली आहे. त्यामुळे निवडणुका होत असलेल्या 37 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपला कितपत यश येते, हे खर्‍या अर्थाने निवडणूक निकालानंतरच समजणार आहे.

संगमनेर तालुक्यातील 37 ग्रामपंचायतींसाठी 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. 5 डिसेंबरला प्राप्त अर्जाची छाननी करण्यात येणार आहे 7 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील, त्याच दिवशी दुपारी 3 वाजेल्या नंतर राहिलेल्या उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप केले जाईल. 18 डिसेंबरला मतदान तर 20 डिसेंबरला मत मोजणी होणार आहे.

गाव कारभारी थेट जनतेतून येणार !

निवडणुका होणार असणार्‍या ग्रामपंचायत निवडणुकात सरपंच अर्थात गावचा कारभारी थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने या निवडणुकांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

थंडीत वातावरण तापले

लोकनियुक्त सरपंच होण्यासाठी अनेकांनी पक्षश्रेष्ठींचे उंबरठे झिजवले आहेत. या निवडणुका ऐेन थंडीत होत असल्या तरी संगमनेरच्या ग्रामीण भागातील राजकीय वातावरण गरमा गरम झाले आहे.

Back to top button