Jalgaon : क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न राहिले अपुर्ण, गॅस गिझरने घेतला विद्यार्थ्याचा बळी | पुढारी

Jalgaon : क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न राहिले अपुर्ण, गॅस गिझरने घेतला विद्यार्थ्याचा बळी

जळगाव : बाथरूमच्या गिझरमधून गॅस गळती झाल्यामुळे १६ वर्षीय मुलाचा गुदमरून मृत्यू झाला. ही घटना एरंडोल येथील रेणुका नगरात घडली आहे. यश (साई) वासुदेव पाटील असे या मुलाचे नाव आहे, तो इयत्ता दहावीत शिकत होता. त्याचे वडील व्ही. टी. पाटील हे त्याच शाळेत शिक्षक आहेत. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

साई हा अंघोळीसाठी गेला होता. बराच वेळ होवूनही तो बाहेर न आल्यामुळे आई-वडिलांना चिंता वाटली. त्यांनी दरवाजा ठोठावला असता काही एक प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी त्याचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता तो मृत झाल्याचे घोषित करण्यात आले. यावेळी आई-वडिलांनी एकच हंबरडा फोडला. हे वृत्त वाऱ्यासारखे शहरात पसरले असता नागरिकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली.

शिक्षणासाठी पुण्याला जाणार होता…

यश हा शिक्षक वासुदेव पाटील यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, वडील, मोठी बहीण असा परिवार आहे. चार महिन्यापूर्वीच त्याची मोठी बहीण पुणे येथे नोकरीला लागली होती. तर यश दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी पुण्याला जाणार होता. एरंडोल ग्रामीण रुग्णालयात डॉ. कैलास पाटील, डॉ. मुकेश चौधरी यांनी शवविच्छेदन केले.

क्रिकेट सामन्यात बांगलादेशविरुद्ध खेळला…

यश हा उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून एरंडोल शहरासह परिसरात परिचित होता. सायकल चालवणे, व्यायाम आणि क्रिकेटचा त्याला छंद होता. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली हा त्याचा आदर्श होता. पोदार इंटरनॅशनल स्कूलकडून १६ वर्षाखालील संघात तो अमरावती येथे बांगलादेशविरुद्ध खेळला होता. या सामन्यात त्याने ११२ धावा काढल्या होत्या. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख जगदीश पाटील व खडके येथील एम.डी. माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र पाटील यांचा तो पुतण्या होता.

हेही वाचा :

Back to top button