पिंपरी : दुर्गा टेकडी हाऊस फुल ! व्यायामप्रेमींची सकाळ-संध्याकाळ होतेय गर्दी | पुढारी

पिंपरी : दुर्गा टेकडी हाऊस फुल ! व्यायामप्रेमींची सकाळ-संध्याकाळ होतेय गर्दी

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरातील तापमानाचा पारा घसरल्याने निगडी येथील दुर्गा टेकडीवर सकाळ-संध्याकाळी फिरायला येणार्‍यांची तसेच व्यायामप्रेमींची मोठी गर्दी होत आहे. गर्दीमुळे दुर्गा टेकडी उद्यान फुलून जात आहे. या गर्दीने आताप्रर्यंतचा उच्चांक मोडला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहराच्या तापमानाचा पारा घसरल्याने कडाक्याची थंडी पडत आहे. या ऋतूमध्ये व्यायाम करणे आरोग्यदृष्ट्या फायदेशीर असल्याने परिसरातील नागरिक दुर्गा टेकडीवर व्यायामासाठी येत असल्याने येथे मोठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे. येथील जॉगिंग ट्रॅक सुरक्षित असल्याने साहजिकच येथे मॉर्निंग वॉकसाठी व्यायाम व पर्यावरणप्रेमींची गर्दी दिसून येते.

हे उद्यान 75 एकर परिसरात तसेच 3.5 किमीच्या परिसरात उंचावर व्यापलेले असून, येथे एकूण दोन लाख वेगवेगळ्या वनस्पतींची झाडे आहेत. यातून नागरिकांना शुद्ध ऑक्सिजन मिळतो. या उद्यानात मोर, ससे, खारूताई, पारवे, फुलपाखरू, चिमण्या, बदक आदी पक्षी फिरावयास आलेल्यांच्या दृष्टिपथास पडतात. उद्यानाच्या आजूबाजूला आकुर्डी, निगडी, रावेत, किवळे, मामुर्डी ही उपनगरे आहेत. शाळा, महाविद्यालये तसेच मोठा आद्योगिक परिसर आहे. टेकडीवरून पहाटेच्या वेळी परिसराचे नयनरम्य दृश्य दृष्टीस पडते.

टेकडीला आले यात्रेचे स्वरूप
विविध प्रकारच्या ज्यूस, सरबत, औषध काढा स्टॉल्सही येथे थाटण्यात आले आहेत. येथे नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेता फळे, भाजी-पाला; तसेच फुले विक्रेत्यांची गर्दी येथे होत आहे. तसेच बाजूलाच मनोरंजननगरी अप्पू घर असल्यामुळे दुर्गा टेकडीला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

कार पार्किंग पडले अपुरे
शनिवार व रविवार येथे व्यायाम करण्यासाठी आलेल्यांच्या वाहनांमुळे येथील वाहनतळ अपुरे पडत होते. वाहनतळ फुल्ल झाल्याने काही जणांनी आपली वाहने रस्त्याच्या बाजूला लावलेली होती.

तरूणांची भरतीसाठी तयारी
पोलिस किंवा इतर दलाच्या भरतीच्या तयारीसाठीही काही युवक-युवती येथे व्यायामाचा सराव करताना दिसतात.

व्यायामसाठी पहाटे पाचपासून या ठिकाणी नागरिक येतात. यामध्ये ज्येष्ठांपासून लहानांचा समावेश आहे. येथे योगा, प्राणायम मेडिटेशन तसेच ओपन जिमचीही सोय आहे. या ठिकाणी स्वच्छ व खेळती हवा, कोवळी किरणेही उत्तम आरोग्यसाठी आवश्यक असल्याने नागरिक आवजून हजेरी लावतात. शनिवार, रविवार सकाळ, सायंकाळ येथे सुमारे चार ते साडेचार हजार नागरिक व्यायामासाठी व फिरण्यासाठी हजेरी लावतात.

                                                                             -हनुमंत चाकणकर,
                                                                              उद्यान सहायक

 

Back to top button