हॉटेलमधील जेवणाचे बिल 1.36 कोटी रुपये! | पुढारी

हॉटेलमधील जेवणाचे बिल 1.36 कोटी रुपये!

अबुधाबी : ‘हौसेला मोल नाही’, असे म्हटले जाते. मात्र, तरीही कुणी हॉटेलमधील जेवणासाठी एक कोटी रुपयांचा चुराडा करील असे आपल्या (मध्यमवर्गीय) मनातही येणार नाही. आता अशा तगड्या बिलाचा एक फोटो समोर आला आहे. सेलिब्रिटी शेफ सॉल्ट बे (नुसरेत गोके) याच्या अबूधाबीमधील रेस्टॉरंटचे हे बिल असून ते 1.36 कोटी रुपयांचे आहे!

सोशल मीडिया सेन्सेशन सॉल्ट बे (नुसरेत गोके) हा हॉलीवूड स्टार्स, प्रसिद्ध फुटबॉलपटू आणि इतर सेलिब्रिटींचा आवडता शेफ आहे. मागील काही वर्षांपासून त्याचे भाज्या कापतानाचे, रेसिपी बनवतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते, सॉल्ट बेचा पदार्थात मीठ टाकतानाचा एक फोटो आजही अनेक मीमर्सचा आवडता आहे. सॉल्ट बे आता अनेक फॅन्सी रेस्टॉरंटस्मध्ये सेलिब्रिटी आणि राजकारण्यांना भन्नाट मेजवान्या खाऊ घालण्यात व्यस्त असतो.

यावरून आपल्याला अंदाज आलाच असेल की सॉल्ट बेच्या हातचं जेवण चाखणं प्रत्येकाला परवडण्यासारखं नाही. सॉल्ट बेची क्रेझ इतकी आहे की अनेकजण लाखो रुपये खर्च करून त्याच्या हातच्या रेसिपी चाखण्यासाठी जातात, अलीकडेच सॉल्ट बेने संयुक्त अरब अमिरातीच्या अबुधाबीत असलेल्या आपल्या ‘नुसर-एट रेस्टॉरंट’मधील एका ग्राहकाच्या बिलाचा फोटो शेअर केला होता. याला कॅप्शन देताना त्याने “क्वॉलिटी कधीही महाग नसते,” असे म्हटले होते.

एका अर्थी सॉल्ट बेचं म्हणणं आपण खरं जरी मानलं तरी क्वॉलिटीची किंमत या बिलामध्ये चक्क 1. 36 कोटी रुपये असल्याचे दिसत आहे. या बिलातील एका एका पदार्थाचे भाव बघून नेटकरीही हादरून गेले आहेत. बिलावरील सर्वात स्वस्त पदार्थ आहे फे्ंरच फ्राईज; पण त्याचीच किंमत जवळपास 4000 डॉलर्स लावली आहे. या रकमेत वर्षभर पुरेल एवढं धान्य घरात आणता येईल अशा प्रतिक्रिया नेटकर्‍यांनी दिल्या आहेत.

सॉल्ट बेच्या रेस्टॉरंटच्या वेबसाईटनुसार, अबुधाबी रेस्टॉरंटमधील स्टार्टर डिशची किंमत 19,000 रुपयांपासून पुढे सुरू होते. या हॉटेलमधील सोन्याच्या पानातील मांस शिजवण्याची पद्धत प्रसिद्ध आहे. ‘नुसर-एट’मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात बिल भरण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्यावर्षी, त्याच्या लंडनच्या रेस्टॉरंटमध्ये काही ग्राहकांनी एका वेळेच्या जेवणासाठी तब्बल 1800 पौंड, म्हणजेच अंदाजे 1.80 लाख रुपये भरले होते.

Back to top button