Nashik : यंदाच्या दिवाळीत एसटी सुसाट! 11 दिवसांत 'इतक्या' कोटींची कमाई
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
यंदाच्या दिवाळीत एसटी सुसाट धावल्याने एसटी महामंडळाच्या तिजोरीत मोठी भर पडली. 21 ते 31 ऑक्टोबरदरम्यान एसटी महामंडळाकडून हंगामी दरवाढीमुळे या 11 दिवसांच्या कालावधीत एसटीने सुमारे 10 कोटी 99 लाखांचे उत्पन्न मिळविले. वसूबारसपासून नाशिक विभागातून एसटीने विविध मार्गांवर सुमारे दीड लाख प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचविण्याची जबाबदारी एसटी महामंडळाने यशस्वी पार पाडली.
कोरोनानंतर यंदा दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संभाव्य गर्दी लक्षात घेऊन दिवाळी हंगामासाठी नियमित फेर्यांसह नाशिकहून धुळे, जळगाव, नंदुरबार, औरंगाबाद, पुणे, मुंबई आदी मार्गांवर अडीचशे जादा बसेस सोडण्याचे नियोजन एसटी प्रशासनाने केले होते. प्रवाशांनी एसटीच्या प्रवासी वाहतूक सेवेला प्रतिसाद दिल्याने जुने सीबीएस, ठक्कर बाजार, महामार्ग, नाशिकरोड, निमाणी आदी बसस्थानकांमध्ये माहेरवाशिणींनी गर्दी केली होती.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनाने महामार्ग बसस्थानकातून मुंबई, नगर, सोलापूर, सातारा यासाठी तर ठक्कर बाजार येथून खानदेश, औरंगाबाद, पुणे या मार्गावर बसेस सोडण्यात आल्या होत्या. तर जुने सीबीएस बसस्थानकातून जिल्हांतर्गत मार्गावर एसटी धावली. प्रवाशांच्या गर्दीनुसार बसेस उपलब्ध करून दिल्या जात होत्या. विशेषत: खानदेश पट्ट्यातील धुळे, नंदुरबार, जळगाव आदी ठिकाणाच्या प्रवासासाठी मोठ्या प्रमाणात एसटीची मागणी होत होती. खानदेश मार्गावरील सर्व बसेस प्रवाशांनी ओसंडून वाहत होत्या. दरम्यान, सध्या शाळा-महाविद्यालयांना दिवाळीच्या सुटया असल्याने 9 नोव्हेंबरपर्यंत जादा बसेस सुरू राहणार असल्याचे एसटी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
आगारनिहाय मिळालेले उत्पन्न
आगार उत्पन्न (लाख) प्रवाशी संख्या
नाशिक(1) 224.95 86001
नाशिक(2) 81.06 157430
मालेगाव 89.3 127989
मनमाड 57.13 80477
सटाणा 95.32 150998
सिन्नर 89.21 149625
नांदगाव 70.38 109633
इगतपुरी 59.83 84189
लासलगाव 63.13 93065
कळवण 93.8 186071
पेठ 52.7 79561
येवला 54.51 81844
पिंपळगाव 68.04 93943
एकूण 1099.36 1,48,0826