

पुणे; पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाची (महानंद) आर्थिक स्थिती बिकट असून, 'महानंद'ला दूध पुरवठा करणार्या जिल्हा संघाची रक्कम देण्यासाठी राज्य सरकार 10 कोटी रुपये तत्काळ देणार असल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. 'महानंद' राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळास (एनडीडीबी) काही कालावधीसाठी चालविण्यास देण्याबाबतचा प्रस्ताव असून बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महानंदच्या समस्यांच्या अनुषंगाने येथील विधानभवन येथे गुरुवारी (दि.3) सकाळी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार हरिभाऊ बागडे, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता, महानंदचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत शिपूरकर, दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांच्यासह राजारामबापू सहकारी दूध संघाचे माजी चेअरमन विनायक पाटील, संगमनेर तालुका सहकारी दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख आणि जिल्हा व तालुका दूध संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बागडे, देशमुख यांच्यासह डी. के. पवार, विनायक पाटील व अन्य दूध संघाच्या प्रतिनिधींनी विविध अडचणी मांडत सूचनाही यावेळी केल्या. बैठकीस पुणे प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी प्रशांत मोहोड, उपनिबंधक सुधीर खंबायत, महानंदचे महाव्यवस्थापक शैलेंद्र साठे, कात्रज डेअरीचे प्रभारी कार्यकारी संचालक संजय कालेकर, एनडीडीबीचे वरिष्ठ अधिकारी अनिल हातेकर आदी उपस्थित होते.