नाशिक : परतीच्या पावसाचा धुमाकूळ ; मका पिकाचे सर्वाधिक नुकसान | पुढारी

नाशिक : परतीच्या पावसाचा धुमाकूळ ; मका पिकाचे सर्वाधिक नुकसान

नाशिक (भालूर) : पुढारी वृत्तसेवा

परतीच्या पावसाने परिसरात गुरुवारी (दि.20) पहाटे ३:३० वाजता सलग दीड तास धुमाकूळ घालत मका, कांदारोपे, कांदा, भुईमुग, सोयाबीन आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मान्सून परतीच्या शेवटच्या टप्प्यावर असताना जोर ओसरला असे वाटत असताना शेतकऱ्यांनी मका पिकाची कापणी करण्यास सुरुवात केली. त्यातच पहाटे ३:३० वाजता अचानक पावसाचे आगमन झाल्याने पिकाचे नुकसान होवून होत्याचे नव्हते झाले. वारंवार पावसाच्या आगमनामुळे शेतकरी त्रस्त झालेला आहे. मका पिकाचे नुकसान झाले असून शेतातच पडलेली कणसे पावसाने पूर्णतः भिजून गेली आहेत. काहींच्या शेतातील कणसेही पाण्याबरोबर वाहून गेली असल्याने चारा आणि कणसांचेही अतोनात नुकसान झाले आहे.

भय इथले संपत नाही…
शेतकऱ्यांनी मागील वर्षी चाळीत साठवून ठेवलेला कांदा आतापर्यंत ठेवण्यात आल्याने हा कांदा सडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हा कांदा उकिरड्यावर फेकण्याशिवाय पर्याय राहिला नाही. अशातच नवीन कांदा लागवड करण्यासाठी तयार केलेली रोपेही अतिवृष्टीमुळे सडत आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पुन्हा लागवडीसाठी कांद्याची रोपे विकत घेण्यासाठी भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे शेती करायची तरी कशी असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे.

पंचनामे झाल्यानंतरही नुकसान….
पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे शासनाने पूर्वीचे पंचनामे केले. मात्र गुरुवारी (दि.20) झालेल्या पावसामुळे  मक्याच्या पिकाची कापणी झाल्यांनतर नुकसान झाल्याने पुन्हा पंचनामे करण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.

वरातीमागून घोडे….….
पिक विमा कंपनीकडे ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढलेला आहे. त्यांचे नुकसान झाल्यानंतर विमा कंपनीकडे तक्रार केल्यानंतर पिकाचा पंचनामा करण्यासाठी पंधरा दिवस ते महिन्याचा कालावधी लागतो. पिकाचे नुकसान झाल्यानंतर शेतकरी नवीन पिक घेण्याच्या तयारीत असतो. त्यामुळे तो पंचनाम्यासाठी एक महिना प्रतीक्षा करू शकत नसल्याने नुकसान झाल्यानंतर विमा कंपनीचे वरातीमागून घोडे असा प्रकार सुरु असल्याने शेतकरी याबाबत नाराजी व्यक्त करीत आहेत. कंपनीकडे तक्रार दाखल झाल्यानंतर त्वरित पंचनामे करण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

हेही वाचा:

Back to top button