पुणे : अमराठी भाषकांचीही दिवाळीची जोरदार तयारी | पुढारी

पुणे : अमराठी भाषकांचीही दिवाळीची जोरदार तयारी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दिवाळी म्हणजे प्रकाशोत्सव… हा प्रकाशोत्सव जसा महाराष्ट्रात आनंदात साजरा केला जातो, त्याच पद्धतीने अमराठी भाषकही दिवाळी उत्साहात साजरी करतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्यात राहणार्‍या अमराठी भाषकांनीही दिवाळीची जोरदार तयारी केली आहे. कपड्यांपासून ते दागिन्यांपर्यंत… मिठाईपासून ते फराळापर्यंत… आपल्या संस्कृतीचा अन् परंपरेचा बाज जपत प्रत्येक जण दिवाळी साजरी करणार असून, दिवाळीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. आनंद, चैतन्य अन् उत्साह घराघरांत पाहायला मिळत आहे. पुण्यात नोकरीनिमित्त आणि व्यवसायानिमित्त अनेक अमराठी भाषीक वास्तव्यास आहेत.

प्रत्येक जण आपल्या संस्कृतीप्रमाणे अन् परंपरेप्रमाणे दिवाळीचे पर्व साजरे करतो. यंदाही पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, गुजरात, राजस्थान, कर्नाटक अशा विविध राज्यांतील अमराठी भाषक याच पद्धतीने आनंदात दिवाळी साजरी करण्यास सज्ज आहेत. मिठाईपासून ते फराळापर्यंत अन् पेहरावातही संस्कृती जपण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला आहे. यानिमित्त घराघरांमध्ये खास मिठाई अन् पंचपक्वान्न तयार होणार आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रीतिरिवाजाप्रमाणे पूजा-अर्चा होऊन दिवाळीचे पर्व साजरे होईल.

1 आयटीतील नोकरदार अंकिता सिंग म्हणाली, ‘मी बंगळुरूला नोकरीनिमित्त वास्तव्यास आहे. परंतु, कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी पुण्यात आले आहे. मी मूळची बिहारची असून, आम्ही येथील पद्धतीनुसार दिवाळी साजरी करतो. यंदाही दिवाळीनिमित्त खास फराळ तयार करण्यात आला आहे आणि दिवाळीच्या विद्युतरोषणाईने अन् आकाशकंदिलाच्या प्रकाशाने घर उजळले आहे. नोकरीनिमित्त पुण्याबाहेर राहत असले, तरी सण-उत्सव मी कुटुंबासोबतच साजरे करते. त्यामुळे यंदा कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करीत असल्याचा आनंदच वेगळा आहे.’

2 रश्मी मुंदडा म्हणाली, ‘आमच्या कुटुंबात दिवाळी आनंदात साजरी केली जाते. संस्कृती आणि परंपरेप्रमाणे आम्ही दिवाळी फराळ आणि मिठाई तयार करतो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रीतिरिवाजाप्रमाणे पूजा-अर्चा होऊन दिवाळीचे पर्व साजरे होईल. दिवाळीनिमित्त कुटुंबातील प्रत्येक जण सुटी घेऊन दिवाळीसाठी एकत्र येतात, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे.’

Back to top button